Smriti Irani: काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षाला पराभूत केल्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादीचा माझ्यावर राग, स्मृती ईराणींची जोरदार टीका
Smriti Irani: स्मृती ईराणी एका पुस्तक प्रकाशनासाठी पुण्यात आहेत. त्या ज्या हॉटेलमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्या हॉटेलखाली राष्ट्रवादीने दुपारपासूनच आंदोलन सुरू केलं.
पुणे: भाजप नेत्या स्मृती ईराणी पुण्यात आल्याने त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन केलं आहे. महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने (ncp) स्मृती ईराणी यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केलं आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या या आंदोलनाचा स्मृती ईराणी (Smriti Irani) यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. अमेठी हा काँग्रेसचा (congress) बालेकिल्ला मानला जातो. 2014मध्ये मी अमेठीतून लढले. त्यानंतर 2019मध्ये आम्ही जोरदार लढत दिली. त्यामुळे काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षांना अमेठीतून दुसरीकडे जावं लागलं. त्यांना दुसऱ्या मतदारसंघात जावं लागलं. भाजपचा एक छोटा कार्यकर्ता आपल्या अध्यक्षाला हरवतो ही बाब काँग्रेसला लागली आहे. त्यामुळेच तेव्हापासून ते माझ्यावर टीका करत असतात. राष्ट्रवादी तर काँग्रेसमधूनच निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांचाही माझ्यावर राग असणं स्वाभाविक आहे, अशी टीका स्मृती ईराणी यांनी केली.
स्मृती ईराणी एका पुस्तक प्रकाशनासाठी पुण्यात आहेत. त्या ज्या हॉटेलमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्या हॉटेलखाली राष्ट्रवादीने दुपारपासूनच आंदोलन सुरू केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना स्मृती ईराणी यांनी दोन्ही काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. 2014मध्ये मी अमेठीतून लढले. त्यानंतर 2019मध्ये आम्ही जोरदार लढत दिली. त्यामुळे काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षांना अमेठीतून दुसरीकडे जावं लागलं. त्यामुळे माझ्यावर ते नाराज असणं स्वाभाविक आहे. राष्ट्रवादी ही काँग्रेसमधूनच निर्माण झाली आहे. त्यामुळे तेही माझ्याविरोधात आक्रमक असणं स्वाभाविक आहे. आम्ही पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून काँग्रेसच्या अध्यक्षाला राष्ट्रीय राजकारणात पहिल्यांदा हरवलं. त्याचे परिणाम काँग्रेस भोगत आहे आणि पुढेही भोगत राहील. त्यांच्या अध्यक्षाला पराभूत केल्याचं काँग्रेसला सदैव दु:ख राहील. भाजपच्या एका साधारण कार्यकर्त्याने त्यांच्या अध्यक्षाला पराभूत केलं, असं स्मृती ईराणी म्हणाल्या.
राष्ट्रवादीचे आंदोलन
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने आज महागाईविरोधात जोरदार आंदोलन केलं. महागाईची राणी, स्मृती ईराणी अशा घोषणाही काँग्रेसने यावेळी दिल्या. या आंदोलनात महिलांचा सर्वाधिक समावेश होता. काँग्रेसच्या काळात स्मृती ईराणी यांनी महागाई विरोधात आंदोलन केलं होतं. आता महागाई जीवघेणी झाली आहे. स्मृती ईराणींना त्याचा आरसा दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस या कार्यकर्त्यांना आंदोलन आवरतं घेण्याची वारंवार विनंती करत होते. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.