Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना घरातूनच आव्हान?; बारामतीतील ‘त्या’ होर्डिंग्जमुळे चर्चांना जोरदार उधाण
पवार घराण्यातच बारामती लोकसभा मतदारसंघावरून रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रिया सुळे यांना घरातूनच तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. बारामती मतदारसंघात लागलेल्या होर्डिंग्जमुळे तसे संकेत मिळत आहेत.
अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 19 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजितदादा गटाने भाजपशी हातमिळवणी केली असून हा गट सत्तेत सहभागी झाला आहे. तर शरद पवार गट हा महाविकास आघाडीतच आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटाचे उमेदवार एकमेकांविरोधात लढताना दिसणार आहेत. तसेच दोन्ही गटाचे नेते एकमेकांच्या उमेदवारांचा प्रचार करताना आणि एकमेकांवर टीका करतानाचे चित्र पाहायला मिळणार आहे. यावेळी दोन्ही गटात कुटुंबामध्येच लढत होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
दोन्ही गटांमध्ये निवडणुकीच्या काळात संघर्ष पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. त्याची चुणूक आतापासूनच पाहायला मिळताना दिसत आहे. कारण अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांचा काल वाढदिवस होता. यावेळी त्यांना शुभेच्छा देणारे मोठमोठे होर्डिंग्ज बारामतीत लागले होते. या होर्डिंग्जमधून सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
घरातूनच आव्हान
बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने भले मोठे होर्डिंग्ज लागले आहेत. त्यावर सुनेत्रा पवार आणि अजितदादा पवार यांचा फोटो आहे. तसेच सोबत संसदेचा फोटोही होर्डिंग्जवर लावण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे भागात हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यावर सुनेत्रा पवार यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बारामतीतून सध्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना घरातूनच आव्हान मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
सामाजिक कार्यात सक्रिय
सुनेत्रा पवार या सामाजिक कार्यात सक्रिय असतात. अनेक कार्यक्रमात त्या भाग घेत असतात. नागरिकांशी संपर्क साधून असतात. त्यामुळे त्या निवडणुकीत उभ्या राहिल्यास सुप्रिया सुळे यांना मोठं आव्हान मिळण्मयाची शक्यता आहे. शिवाय सुनेत्रा पवार उभ्या राहिल्यास भाजपमधून उमेदवार दिला जाणार नाही. त्यामुळे उद्या सुनेत्रा पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यापैकी कुणीही जिंकलं तरी बारामती मतदारसंघ पवार घराण्याकडेच राहणार आहे.
त्या राजकारणात नाहीत
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी या घडामोडींवर अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काकींचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्या राजकारणात सक्रिय नाहीत. पण आमच बोलणं होत राहतं, असं रोहित पवार म्हणाले.