जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील तर आनंदच; सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान
देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झाला. ज्या भाजप नेत्यांनी आयुष्यभर कष्ट केले आणि 105 आमदार निवडून आणले. तरीही त्यांच्यावर अन्याय झाला. काँग्रेस विचाराचा मुख्यमंत्री पाहिजे याचा फडणवीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. या त्यांच्या दिलदारपणाचं, त्यागाचं मी मनापासून स्वागत करते.
सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सोलापूर | 8 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना अजितदादा गटात येण्याच्या ऑफर येत आहेत. अजितदादा गटात आल्यास तुम्हाला मुख्यमंत्री करू, अशी ऑफर जयंत पाटील यांना आली आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. अजितदादा गटाकडे गेल्यावर जयंत पाटलांना मुख्यमंत्री करणार असतील तर चांगलंच आहे. ही चांगली गोड बातमी आहे. जयंतराव मुख्यमंत्री होणार असतील तर मला आनंदच होईल, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे विरोधकांना संपवायला निघालं आहे. अदृश्य शक्ती आहे. यात डाऊट नाही. दिल्लीची अदृश्य शक्ती आहे. ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कटकारस्थान करत आहे. मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा देवेंद्र फडणवीस या तिघांविरोधात ही अदृश्य शक्ती कट कारस्थान करत आहे, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.
I C E चा अर्थ सांगितला
यावेळी सुप्रिया सुळे I C E या शब्दाचा अर्थ सांगितला. आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे 90 ते 95 टक्के लोकांवरच आईस असतं. आईस म्हणजे बर्फ नाही. आय सी ई म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी. केंद्र आणि महाराष्ट्र सरकार सर्वांना आईस करून टाकतं. कोणी विरोधात बोलला तर आईस करून टाकलं जातं. त्यामुळे आम्हालाही त्याची सवय झाली आहे. नोटीस येतच असतात, असं त्या म्हणाल्या.
परीक्षे आधीच निकाल कसा माहीत?
निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीची सुनावणी सुरू आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मेरिटवर झालं तर चांगलंच आहे. राष्ट्रवादीची स्थापना कुणी केली, पक्ष कुणाचा आहे आणि पक्षाचा अध्यक्ष कोण आहे हे कश्मीर ते कन्याकुमारीपासून सर्वांना माहीत आहे. निवडणूक आयोगात आम्ही गेलो नाही. भुजबळांची टीम निवडणूक आयोगात गेली. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चिन्हाची लढाई करतात त्यांना परीक्षेला बसण्याआधीच निकाल कसा माहीत? एक तर पेपर फुटलेला आहे. किंवा दिल्लीतील अदृश्य शक्ती यांच्या कानात येऊन सांगते चिन्ह आणि पक्ष तुम्हालाच मिळणार आहे म्हणून. काही तरी गोलमाल आहे ना? परीक्षेला बसण्याआधीच निकाल कसा माहीत? असा सवाल त्यांनी केला.
करारा जवाब दिला असता
ज्यांच्या ताटात आपण जेवलो ते कधी विसरायचे नसते. मात्र छगन भुजबळ वयाने मोठे आहेत म्हणून मी त्यांना उत्तर देत नाही. नाहीतर करारा जबाव दिला असता, असं सुप्रिया सुळे यांनी सुनावलं.