राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुप्रिया सुळे यांच्याकडून पहिल्यांदाच अजितदादांचं कौतुक; नेमकं काय म्हणाल्या?
यावर्षी निवडणूका होणार आहेत. जगातील अनेक देशात निवडणूक होत आहेत. देशात, राज्यात आणि जगात बदल होणार आहेत. मोठ्या निवडणूका आहेत. आर्थिक दृष्ट्या मोठे बदल होणार आहेत. जगात घडणाऱ्या अनेक बदलांचा परिणाम आपल्या आयुष्यावर पडतो. मणिपूर सारख्या घटनेचा आपल्यावर परिणाम होतो, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 7 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा गटाने भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर अजितदादा गट सत्तेत सामीलही झाला. त्यानंतर अजितदादा गटाने थेट सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात धाव घेऊन पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावाही केला. या दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्ला करण्याची एकही संधी सोडली नाही. इतकेच नाही तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना कसा धोका दिला हे सांगत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे दोन्ही गटात वितुष्ट आल्याचं चित्र निर्माण झालं होतं. असं असतानाच आज शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबई परिसरात स्वच्छता अभियानावर भर दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे सकाळीच उठून या अभियानात भाग घेताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या अभियानाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोले लगावतानाच अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सुप्रिया सुळे यांनी अचानक अजितदादांचं कौतुक केल्याने त्यावर राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नालेसफाई करून प्रश्न सुटत नाही
स्वच्छता अभियान ही चांगली गोष्ट आहे. आधी सकाळी 7 वाजता अजितदादा पुण्यामध्ये काम करताना धावपळ करताना दिसायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अजितदादांची स्टाईल कॉपी करताना दिसत आहेत, असं कौतुक सुप्रिया सुळे यांनी केलं. तसेच, मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांना कधीच एवढ्या सकाळी कुठली पाहणी करताना पाहिलं नव्हतं. एका नालेसफाईची पाहणी करून आणि सकाळी 8 वाजता सफाईच्या ठिकाणी जाऊन प्रश्न सुटत नाहीत, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनात शिंदे यांना लगावला.
दादा सीनियर सिटीजन नाऊ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर बोलताना रोहित अजून बच्चा आहे, असं म्हटलं होतं. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा वयाने मोठा आहे. तो रोहितचा काका आहे. थोडा काही बोलला तर आपण एवढं कशाला मनाला लावून घ्यायचं? रोहितचं वय 40 तर दादा 65 वर्षाचा आहे. त्यामुळे काकांनी काही बोललं तर इट्स ओके. दादा सीनियर सिटीजन नाऊ, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भुजबळांचं कोणीच ऐकत नाही
यावेळी त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या टीकेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. भुजबळ माझ्या वडिलांच्या वयासारखे आहेत. त्यांना कॅबिनेटमध्ये न बोलता बाहेर पत्रकारांशी येऊन आरक्षण संदर्भात बोलावं लागत आहे. भुजबळांनी आरक्षणा संदर्भात बोललेल कॅबिनेटमध्ये कोणीच ऐकत नाही, असा चिमटा काढतानाच मराठा, लिंगायत, मुस्लिम आरक्षण संदर्भात राज्य सरकार फसवणूक करतंय. एवढ्या मोठ्या राज्याचे सर्वेक्षण सात दिवसात कसे होईल?; असा सवाल त्यांनी केला.