शरद पवार यांच्यावर नरेंद्र मोदी यांची टीका, सुप्रिया सुळे म्हणाल्या, इतना तो हक बनता है…
Supriya Sule on Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथील कार्यक्रमात शरद पवार यांच्यावर टीका केली. या टीकेला सुप्रिया सुळे यांनी खास शैलीत उत्तर दिले. सुप्रिया सुळे यांनी इतना तो हक बनता है...म्हणत त्यांनी उत्तर दिले.
पुणे | 27 ऑक्टोंबर 2023 : शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी कार्यक्रम झाला. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नरेंद्र मोदी यांनी अनेक भाषणांच्या माध्यमातून पवार साहेबांची स्तुती केलेली आहे. मोदींनीच पद्मविभूषण दिलं आहे. शेतीमधील कामासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. एका गोष्टीचा मला आनंद आहे की, महाराष्ट्रात आल्यावर ते पवार साहेबांचं नाव घेतात. कधी टीका करून तर कधी प्रेमाने नाव घेत असतात. पण राजकारणात एवढं तर चालतंच. ”इतना तो हक बनता है’. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना मोदी नेहमी नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे. यावेळी मोदींनी करप्शनचा आरोप आमच्यावर केला नाही.
खोके सरकार दिल्लीसमोर अखंड नमतं घेतंय
मराठा आरक्षण हे राज्यातील ट्रिपल इंजिनच्या सरकारचं अपयश आहे. मराठी माणसाच्या हक्काच्या मेरीटवरच्या नोकऱ्या तुम्ही इतर राज्यात घेऊन जाणार? हे खोके सरकार अखंड नमतं घेतंय दिल्लीसमोर. आम्ही दिल्लीसमोर कधी झुकलो नाही आणि कधी झुकणार नाही. राज्यात महागाईवर अस्वस्था आहे. गुंतवणुकीचा प्रश्न आहे. बेरोजगारी वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील महागाई, बेरोजगारी आणि हक्काचे रोजगार बाहेर जात आहेत ते आधी थांबवावे. मग दुसऱ्यांना नावं ठेवावं.
हिरे व्यापारी का जातायं…
मुंबईत हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांची गुंतवणूक आपण जपली होती. पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्यासाठी बीकेसीत मोठी इमारत उभारून इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं. आज ते सर्व सुरतला जात आहे. एवढे लोक सुरतला का जात आहे. कारण काय. ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार काय करत आहे. कोणीही यावं दिल्लीवरून आणि महाराष्ट्राल टपली मारून जावं हे या खोके सरकारला चालत असेल. आम्हाला नाही चालणार. शेवटी महाराष्ट्राने या व्यवसायासाठी मोठं योगदान दिलं आहे. मराठी माणसाचा काही हक्क आहे की नाही?
विशेष अधिवेशन बोलवा
भाजप हा एक जुमलेबाज पक्ष आहे. त्यांना मी भ्रष्ट जुमलेबाज पक्ष म्हणते. कारण ते भ्रष्ट आहेत. जुमलेबाज आहेत. याचं कारण मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर सातत्याने बोलत राहिले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. ते या घटकांना आरक्षण दिलं पाहिजे होते. पण दिलं नाही. माझी अनेक दिवसांची मागणी आहे. महाराष्ट्रातील अस्वस्थता बघता तातडीने विधानसभेचं अधिवेशन बोलवा. पाच नाही, दहा दिवसाचं सेशन घ्या. मराठा, धनगर, मुस्लिम आणि लिंगायत आरक्षणावर घ्या. इथून संवैधानिक तरतूद करून दिल्लीत प्रस्ताव पाठवा. आम्ही दिल्लीत संवैधानिक तरतूद करून पाठवू. मराठा, लिंगायत, धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण मिळत असेल तर आम्ही पूर्ण ताकदीने त्या सरकारबरोबर उभं राहू