‘लव्ह’चा अर्थ कळतो, ‘जिहाद’चा माहीत नाही; सुप्रिया सुळे यांनी उडवली हिंदू जन आक्रोश मोर्चाची खिल्ली
केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार आहे हे बघावं लागेल. जूनमध्ये मंदी येणार आहे. असं नारायण राणे हे म्हणत आहेत. त्यामुळे त्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे.
पुणे: मुंबईत सकल हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा आणि धर्मांतर विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या मोर्च्यातून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र, या मोर्चाची खिल्ली उडवली आहे. लव्ह जिहादचा अर्थ मला माहीत नाही. लव्हचा अर्थ मला कळतो. जिहादचा अर्थ मला कळत नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी या मोर्चाची खिल्ली उडवली आहे.
मुंबईतील लिंगायत समाजाच्या मोर्चावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकतर हा मोर्चा सरकार विरोधात आहे. हे असंवेदनशील सरकार आहे, म्हणून लोकांना रस्त्यावर उतरायला लागतं आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घ्यायला हवे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ठाकरे गटालाच धनुष्यबाण मिळावं
यावेळी त्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावरही भाष्य केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आहे. बाळासाहेबांनीच त्यांचा उत्तराधिकारी नेमला आहे. त्यामुळे ठाकरे गटालाच निवडणूक चिन्हं मिळायला हवं, असं माझं स्पष्ट मत आहे, असं त्या म्हणाल्या.
विषय खूप वेळा झाला
यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या विषयावर बोलणं टाळलं. हा विषय आता खूप वेळा झाला आहे. जयंतराव पाटील देखील यावर बोलले आहेत. त्यामुळे आणखी बोलण्याची गरज नाही, असं त्या म्हणाल्या.
राणेंच्या विधानावर चर्चा व्हावी
केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार आहे हे बघावं लागेल. जूनमध्ये मंदी येणार आहे. असं नारायण राणे हे म्हणत आहेत. त्यामुळे त्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
वरिष्ठ स्तरावर चर्चा होणार
वंचित आघाडीच्या युतीवर त्यांनी भाष्य करणं टाळलं. शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने त्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावर बोलणं योग्य नाही, असं सांगतानाच महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जेव्हा भेटतील त्यावेळी ही चर्चा होऊ शकते. कोणी काही प्रस्ताव आणला तर चर्चा वरिष्ठ स्तरावर होईल, असं त्या म्हणाल्या.