सरनाईक, जाधव, अडसूळ, गवळी आणि परब यांच्याविरोधात सोमय्या यांचे किती ट्विट?, किती पत्रकार परिषदा?; सुषमा अंधारे यांनी केली पोलखोल
सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर आरोप केले. त्यांना त्रास देण्याचं काम केलं. नंतर भावना गवळींनी शिवसेना सोडली. त्यानंतर भावना गवळींचं पुढे काय झालं? असा सवाल त्यांनी केला.
पुणे : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना चांगलेच धारेवर धरले आहे. सोमय्या यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप केले. त्यांच्या विरोधात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. अनेक ट्विट केले. पण ते सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला आल्यावर त्यांच्याविरोधात सोमय्या बोलत नाही. याचा अर्थ काय होतो? ईडी आणि अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षेत्रात वारंवार हस्तक्षेप करणारे सोमय्या कोण आहेत? सोमय्या ईडीचे अधिकारी आहेत की अतिक्रमण विभागाचे कर्मचारी? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. तसेच सोमय्या यांनी कुणाविरोधात किती पत्रकार परिषदा घेतल्या याची जंत्रीच सादर केली.
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांची पोलखोल केली. सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्या विरोधात 22 पत्रकार परिषदा घेतल्या. भावना गवळी यांच्याविरोधात 8, यशवंत जाधव यांच्याविरोधात 16, अर्जुन खोतकर यांच्या विरोधात 9 आणि आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात 6 पत्रकार परिषदा घेतल्या. तसेच भावना गवळी यांच्या विरोधात 124 ट्विट केले. अडसूळ यांच्याविरोधात 20, सरनाईक यांच्याविरोधात 55, खोतकर यांच्या विरोधात 15 आणि यशवंत जाधव यांच्या विरोधात 21 ट्विट केले. सोमय्यांना बाकी काही काम नाहीये का? की भाजपने आरटीआय टाकण्यासाठी माणूस ठेवला आहे काय? असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
सोमय्या ढवळाढवळ करतातच कसे?
खेड प्रकरणात सदानंद कदम यांच्यावर कारवाई झाली. या प्रकरणात सोमय्या दापोलीत कितीवेळा गेले. खेड दापोलीत सोमय्या 11 वेळा गेले. ईडीने दापोलीला भेटी दिल्या असत्या तर समजू शकते. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असत्या तरीही समजू शकले असते. पण किरीट सोमय्या कोण आहेत? ते ईडीचे कर्मचारी की अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी आहेत का? सोमय्या ईडी आणि अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षेत्रात ते ढवळाढवळ करतातच कसे?, असा सवाल अंधारे यांनी केला.
भावना गवळींच पुढे काय झालं?
सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर आरोप केले. त्यांना त्रास देण्याचं काम केलं. नंतर भावना गवळींनी शिवसेना सोडली. त्यानंतर भावना गवळींचं पुढे काय झालं? असा सवाल त्यांनी केला. कंत्राटी कामगार नेमले जातात तसं त्यांनी कंत्राटी खासदार नेमला असावा. यामिनी जाधवांवर निवडणूक पत्रात मालमत्ता लपवल्याचा सोमय्यांचा आरोप होता. आता पुढे काय झालं? सदानंद कदमांकडे डायरी सापडली अशीच डायरी यशवंत जाधवांकडे होती त्याचं काय झालं? अनिल परबांवर त्यांचा निशाणा होता. अनिर परब जर भाजपकडे गेली तर डायरी गायब होईल का? असा सवाल त्यांनी केला.