मग फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपदाच्या योग्यतेचे समजत नाही का?; सुषमा अंधारे यांचा केसरकर यांना सवाल
आपला मुलगा सर्वोच्च पदावर गेला पाहिजे हे आई म्हणून कोणत्याही आईला वाटते. म्हणून आईंच्या बोलण्यावर कोणतीही टिप्पणी करावी असं मला वाटत नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. माझं वय झालंय. माझ्या डोळ्या देखत अजित मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं अजित पवार यांच्या मातोश्रींनी म्हटलं होतं. त्यावर सुषमा अंधारे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रणजित जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 5 नोव्हेंबर 2023 : अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या आईने व्यक्त केली आहे. त्यावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी अजित दादा यांना मुख्यमंत्री व्हायला त्यांचं वय अजून खूप लहान आहे, असं विधान केलंय. केसरकर यांच्या या विधानाचा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला आहे. अत्यंत कमी वयात फार मोठमोठे पराक्रम करणाऱ्यांची या राज्याला आणि देशाला मोठी परंपरा आहे. त्यामुळे वय हा मुद्दा कधीही येत नाही. वय हाच मुद्दा लावायचा असेल तर मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांचं वय किती होतं? याचा विचार केसरकर यांनी केला पाहिजे. ते फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपदाच्या योग्यतेचे समजत नाही का याचेही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे मीडियाशी संवाद साधत होत्या.
सुषमा अंधारे यांनी यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही टीका केली. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी बंदची हाक दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर अंधारे यांनी टीका केली आहे. सदावर्तेंना आता लोक स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे. सदावर्ते दिवाळीच्या तोंडावर आंदोलन करत आहेत ही एक खेळी आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे वातावरण तयार झालं, त्यात निव्वळ मी फडणवीस यांचा माणूस नाही हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न सदावर्ते करत आहेत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
मनमानी करता येणार नाही
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलेल्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रचूड यांची टिप्पणी योग्य आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्णय अभिलेखासारखे असतात. त्याला कायद्याचे स्वरूप्राप्त होते. पार्लमेंट मधला एखादा कायदा चौकटी बाहेर जात असेल तर त्यावर टिप्पणी करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला असतो. विधिमंडळाने तर सर्वोच्च न्यायालयाचं ऐकलंच पाहिजे. विधिमंडळाने केलेला एखादा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहूनच असतो.
किंबहुना सुप्रीम कोर्टाने सांगितलेला निर्णय यांच्यासाठी कायदा म्हणून ट्रीट करावा लागतो. चंद्रचूड यांची टिप्पणी याही अर्थाने महत्त्वाची आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कोणतेही मनमानी करता येणार नाही. त्यांना शिंदे आणि फडणवीस यांची मदत करण्याची इच्छा असली तरी त्यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल, असं अंधारे म्हणाल्या.
समित्या या फक्त…
ससून रुग्णालयातील प्रकारावरही त्यांनी भाष्य केलंय. राज्यात घटनाबाह्य सरकार सुरू आहे. त्यामुळे ससूनमचा अहवाल वेळेत येईल याची काय शाश्वती आहे. कळवा रुग्णालयाचा अहवाल कुठे गेला? त्याचं काय झालं? समित्या चहा बिस्किटासाठी असतात हा सरकारचा समज झाला की काय अशी शंका आहे, असा टोला त्यांनी लगावला.
वैचारिक कुवत दाखवू नका
यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावरही टीका केली. नीलमजींनी त्यांची खूर्ची वाचवलेली आहे. ज्यांना ज्यांना चेअर वाचवायची आहे ते शिंदे गटात गेले. ज्यांना निष्ठा महत्त्वाची वाटते ते लोक इथे आहेत. निष्ठावान लोकांवर खूर्ची वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांनी टिप्पणी करू नये. आपली वैचारिक कुवत अजिबात प्रदर्शित करू नये, असा हल्लाच त्यांनी चढवला.