Pune Metro : पुणे मेट्रोतून प्रवास करा, अन् मिळवा मोठी सवलत
Pune News : पुणे मेट्रोने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी मेट्रोचे उदघाटन करणार आहे. पुणे शहरातील आणखी दोन मेट्रो मार्ग १ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
पुणे | 28 जुलै 2023 : पुणे शहरातील पायाभूत सुविधा मजबूत होत आहे. पुणे शहरातील वाहतुकीसाठी बसेसची संख्या वाढवण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्प सुरु झाला आहे. आता पुणे शहरातील वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर हे दोन मार्गही १ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गांचे उद्घाटन करणार आहे. मेट्रोने प्रवाशांसाठी सवलत योजनाही जाहीर केली आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
पंतप्रधान करणार उद्घाटन
पुणे शहरातील सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड असा मार्ग आता सुरु होणार आहे. यापूर्वी पिंपरी-चिंचवड फुगेवाडीपर्यंत मेट्रो होती. आता ही मेट्रो सरळ न्यायालयापर्यंत येणार आहे. तसेच दुसरा मार्ग वनाज कॉर्नर ते रुबी हॉल सुरु होणार आहे. हे दोन्ही मार्ग १ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पिंपरी चिंचवडवरुन पुणे शहरात येण्यासाठी ११ किलोमीटरचा मार्ग खुला होणार आहे. यासाठी चाचणी यशस्वी झाली आहे. वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय या मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुपारी १२.३० च्या होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.
सवलत मिळणार
पुणे मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनवणे यांनी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना सवलत मिळणार असल्याचे सांगितले आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकिटदरात ३० टक्के सवलत देणार आहे. पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. तसेच अन्य नागरिकांना शनिवारी आणि रविवारी सवलत मिळणार आहे. मेट्रोचे भाडे १० ते ३० रुपयांपर्यंत आहे. दर दहा मिनिटांना मेट्रो असणार आहे. कमी गर्दीच्या वेळी पंधरा मिनिटांच्या अंतराने मेट्रोची सेवा असेल.
पुणे मेट्रो करणार वीज बचत
पुणे शहरातील मेट्रो स्थानकावर वीज बचत करण्यात येणार आहे. विजेची बचत करण्यासाठी स्थानकावर सौर ऊर्जा पॅनल बसवले जाणार आहे. पुणे मेट्रोच्या 23 स्टेशनवर सौर पॅनल बसवून वीज निर्माती करण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या वीज बिलात चांगलीच बचत होणार आहे.