शरद पवार यांनी आता मार्गदर्शक व्हावं, Udayanraje Bhosale यांचा सल्ला; म्हणाले, हाफचड्डी कधी गेली…
मी जातपात मानत नाही. भविष्यकाळात मेरिटच बघितले जाईल. कायद्याप्रमाणे दहा वर्षानंतर लोकसंख्येच्या आधारे आरक्षण द्या. ठराव नाही, नोटिफिकेशन नाही अन् तरीही इतर समाजाला तुम्ही आरक्षण देत आहात.
सातारा | 15 ऑक्टोबर 2023 : वयाच्या 82व्या वर्षीही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पक्ष बांधणीसाठी फिरत आहेत. जास्तीत जास्त आमदार आणि खासदार निवडून आणण्यासाठी शरद पवार मेहनत घेत आहेत. या वयातील त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. त्यामुळे पवारांचा आदर्श घेण्याचा सल्लाही आजच्या तरुणांना दिला जातो. पण भाजपचे नेते, खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र शरद पवार यांना वेगळाच सल्ला दिला आहे. उदयनराजे यांच्या या सल्ल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
उदयनराजे भोसले यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना शरद पवार यांना सल्ला दिला. निवडणूक लढण्यावरून उदयनराजे यांना सवाल करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी बिनधास्त आणि बेधडक मते मांडली. शरद पवार यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत आलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदापासून केंद्रातील महत्त्वाची पदे भोगली आहेत. त्यामुळे त्यांनी आता नव्या भूमिकेत यावं. शरद पवार हे अनुभवी आणि ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्यांच्या राजकीय अनुभवाचा इतर लोकांना फायदा होईल. त्यांनी राज्याला मार्गदर्शन केल्यास राज्यालाच त्याचा फायदा होईल, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
माझी हौस भागली
उदयनराजे भोसले यांनी यावेळी आपली राजकारणातील हौस भागल्याचंही स्पष्ट केलं. माझी राजकारणातील हौस भागली आहे. निवडणुका लढवण्याची खाज भागली आहे. बघता बघता मी पन्नाशीत कधी गेलो हे समजलंही नाही. हाफचड्डी कधी केली हे कळलंच नाही. त्यामुळे मी आता प्रचारकाच्या भूमिकेत राहणं पसंत करेन, असं उदयनराजे म्हणाले.
निवृत्तीचं वय असावं
शासनात रिटारमेंटचं वय असतं. तसंच राजकारणातही रिटायरमेंटचं वय असलं पाहिजे. त्याची निश्चिती झाली पाहिजे. त्यामुळे तरुणांना राजकारणात चांगली संधी मिळेल. राजकारण्यांना निवृत्तीचं वय लागू केलं पाहिजे, नाही तर लोकांचा आग्रह आहे म्हणून लढतोय असं प्रत्येकजण म्हणत राहील, असा चिमटाही त्यांनी काढला.
तेव्हा का रक्त पाहत नाही?
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं हे मान्य आहे काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. तेव्हा मी जात मानत नाही. एखाद्याला मागासवर्गीय म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. तू मोठा, तू छोटा, तू हलका, तू तालेवार असंच जर करायचे असेल तर दवाखान्यात रक्त चढवताना कुणाचे रक्त आहे ते का पाहात नाही? असा सवाल त्यांनी केला.
जलमंदिरात चोरी झाली होती
यावेळी त्यांनी वाघनखाच्या प्रश्नाला बगल दिली. मी लहान असताना जलमंदिरात चोरी झाली होती. वाघनखांची त्यावेळी चोरी झाली की नाही हे माहिती नाही. मी लहान होतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीतच तारीख आणि इतर वाद निर्माण केले जातात, असं ते म्हणाले.