पुणे-मुंबई चाचणीत वंदे भारतने घेतला डेक्कन क्विनपेक्षा जास्त वेळ
पुणे-मुंबई 191 किलोमीटर अंतर कापण्यासाठी रेल्वेला 3 तास 22 मिनिटांचा वेळ लागला. दुसरीकडे डेक्कन क्विन पुणे-मुंबई अंतर फक्त 3 तास 10 मिनिटांत पार करते.
पुणे : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे. आता पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस 10 फेब्रवारीपासून सुरु होणार आहे. मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावणार आहे. या रेल्वेचा लाभ पुणेकरांना (Punekars) मिळणार आहे. सोलापूरवरुन मुंबई जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 10 फेब्रवारी रोजी करणार आहे. त्यापुर्वी तिची चाचणी गुरुवारी घेण्यात आली.
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस 120 किमी वेगाने धावली. बोरघाटात तिचा वेग ताशी 55 किलोमीटर ठेवण्यात आला. पुण्यावरुन गुरुवारी दुपारी 4 वाजून 50 मिनिटांनी गाडी निघाली. मुंबईला रात्री 8 वाजून 12 मिनिटांनी पोहचली. म्हणजेच पुणे-मुंबई 191 किलोमीटर अंतर कापण्यासाठी रेल्वेला 3 तास 22 मिनिटांचा वेळ लागला. दुसरीकडे डेक्कन क्विन पुणे-मुंबई अंतर फक्त 3 तास 10 मिनिटांत पार करते. इंटरसिटी एक्स्प्रेस 3 तास 10 मिनिटांत पोहचते.
तिकीट दर जास्त
वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर डेक्कन क्विनपेक्षा जास्त आहे. 191 किलोमीटर अंतरासाठी एक्सिक्युटिव्ह वर्गासाठी 855 तर चेअर कारसाठी 525 रुपये तिकीट दर आहे. जास्त तिकीट दर देऊन जास्त वेळ लागत असल्यास पुणेकर वंदे भारतला पसंती कितपत देतील, हा प्रश्न आहे. जो वेळ लागला तो फक्त चाचणी दरम्यान असेल अन् दोन ते अडीच तासांत पुणे-मुंबई अंतर या गाडीने पुर्ण केल्यास तिला पसंती मिळेल.
ताशी 110 किमी वेग
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते सोलापूर दरम्यान ताशी 120 किमी वेगाने धावणार आहे. ती पुण्यातून जाणार असल्याने पुणेकरांना ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा प्रवास अनुभवता येणार आहे.
आठवड्यातून सहा दिवस चालेल
वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी 6.50 वाजता सुटेल. पुण्यात सकाळी 9 वाजता पोहचणार आहे. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता मुंबईला पोहचेल. त्याच दिवशी दुपारी 4.10 वाजता ती मुंबईहून निघेल. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याला पोहचेल. रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहचणार आहे. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध असेल. ही एक्स्प्रेस बुधवारी मुंबईतून आणि गुरुवारी सोलापूरहून धावणार नाही.
मेक इन इंडिया ट्रेन
देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे. वंदेभारतच्या 75 रेकची निर्मिती पहिल्या टप्प्यात होणार असून त्यात जरी चेअरकारचे डबे असले तरी तिची आसने आता अधिक आरामदायी करण्यात आली आहेत.
देशात चार ठिकाणी निर्मिती
पहिली ‘वंदेभारत ट्रेन’ 2018 मध्ये तयार करण्यात आली होती. सध्या देशातील चार रेल्वे कारखान्यात ‘वंदे भारत’ ट्रेनची निर्मिती सुरू असून लातूर येथील नव्या कारखान्यातही तिचे सूटे भाग आणि डबे तयार करण्यात येणार आहे. वंदेभारत ही विनाइंजिनाची 16 डब्यांची ट्रेन असून तिच्या दर एका डब्यामागे एक मोटरकोचचा डबा जोडलेला आहे. त्यामुळे तिच्या पन्नास टक्के चाकांना मोटरची ताकद मिळते. तिचा कमाल वेग प्रति तास 160 कि.मी. इतका आहे. तिच्या मोटरसह सर्व इलेक्ट्रीक पार्ट्स डब्याच्या खालच्या भागात बसविलेले आहेत. ही ट्रेन सुरू होताच अवघ्या सात सेंकदात वेग पकडू शकते.