विधानसभेच्या दोन्ही जागांवर बिनविरोध निवडणूक अवघड, ‘मविआ’कडून जोरदार तयारी
भारतीय जनता पक्षाने पंढरपूर, कोल्हापूर येथे पोटनिवडणूक लढवली असल्याचा दाखला ही दिला जात आहे. तर शिवसेनेनेही काँग्रेसच्या कसबा मतदार संघावर हक्क सांगितल्याने महाविकास आघाडीतही कुरबुरी होण्याची शक्यता आहे.
पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपविरोधात निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली आहे.भारतीय जनता पक्षाने पंढरपूर, कोल्हापूर येथे पोटनिवडणूक लढवली असल्याचा दाखला ही दिला जात आहे. तर शिवसेनेनेही काँग्रेसच्या कसबा मतदार संघावर हक्क सांगितल्याने महाविकास आघाडीतही कुरबुरी होण्याची शक्यता आहे.
कसबा मतदार संघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व आहे. १९९५ पासून सतत भाजपचा उमेदवार विजयी होत आहे. भाजपच्या स्थापनेनंतर १९८० मध्ये अरविंद लेले या मतदार संघातून आमदार झाले होते. त्यानंतर १९८४ मध्ये काँग्रेसचे उल्हास काळोखे विजयी झाले. परंतु १९८९ नंतर पुन्हा भाजप विजयी झाला. १९९१ साली भाजपचे आमदार असलेले अण्णा जोशी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्याठिकाणी रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. त्यात काँग्रेसचे वसंत थोरात यांनी गिरीष बापट यांचा पराभव केला.मात्र त्यानंतर १९९५ पासून सलग पाच वेळा गिरीष बापट विजयी झाले. त्याच मतदार संघातून मुक्ता टिळक विजयी झाल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरुड मतदार संघ सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांचे नाव पुढे आहे. तसेच मुक्ता टिळक यांच्या परिवारातून तिकीट दिल्यास भाजपला सहानभूती मिळेल. त्यामुळे त्यांच्या परिवारातील नावही चर्चेत आहेत. गिरीष बापट यांची स्नुषा स्वरदा बापट, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे अशी मोठी यादी भाजपची आहे.
काँग्रेसचा दावा : भाजपची तयारी सुरु असताना महाविकास आघाडीतून काँग्रेसने कसबा मतदार संघासाठी दावा केला आहे. दोन वेळा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याचा दाखला दिला जात आहे. काँग्रेसकडून माजी नगरसेवक अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे यांची नावे पुढे आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही या मतदार संघावर दावा केला जात आहे.
चिंचवडमध्ये राष्ट्र्वादीचा दावा : पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं ही याच महिन्यात निधन झाले आहे.या दोन जागांवर विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांनी नंतर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे चिंचवडची जागा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.पिंपरी चिंचवड लक्ष्मण जगताप यांची पकड होती. ते कोणत्याही पक्षात असले तरी मनपामध्ये त्यांचे नगरसेवक होते. यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपच्या ताब्यात आली होती. आता भाजपकडून लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचे नाव पुढे आले आहे. तर राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे, भाऊसाहेब भाईर, नाना काटे, मोरश्वर भोंडवे, नवनाथ जगताप अशी मोठी यादी आहे.
मनपाची लिटमस टेस्ट : पुणे शहर व पिंपर चिंचवडमधील पोटनिवडणूक म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट आहे. या निवडणुकीत जो पक्ष विजयी होईल, त्याचा मनपात दावा असणार आहे. यामुळे ही निवडणूक बिनविरोध न करता प्रत्येक पक्ष आपली ताकद अजमवण्याचा प्रयत्न करणार आहे.