25 वर्षांपासून अजितदादा यांना ओळखतो, दादा मैत्रीचा माणूस पण सत्तेचाही पक्का; विजय वडेट्टीवार यांचा सूचक इशारा
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने युतीची ताकद वाढल्याचा भाजपचा दावा आहे, असं विचारलं असता त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना फोडली तेव्हा त्यांना सत्तेत येण्याची शाश्वती नव्हती.
पुणे | 6 ऑगस्ट 2023 : फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. गेल्या 25 वर्षापासून मी विधानसभेत आहे. अजित पवारही 30 ते 35 वर्षापासून सभागृहात आहेत. मी अजितदादांना गेल्या 25 वर्षापासून ओळखतो. दादा हा मैत्रीचा दिलदार माणूस आहे. पण सत्तेचाही पक्का आहे. त्यामुळे मैत्री आणि सत्ता त्यांना अबाधित राहो, असा सूचक इशारा विजय वडेट्टीवार यांनी भाजपला दिला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्रात झालेलं तोडफोडीचं राजकारण जनतेला अजिबात पटलेलं नाही. जनता निवडणुकीची वाट बघत आहे. लोक पक्षातून बाहेर गेले आहेत, पण त्याचा त्या पक्षावर परिणाम होईल असं अजिबात वाटतं नाही. शिंदे सेनेचे फक्त दोनच खासदार निवडून येणार आहेत. हे सर्व्हे सांगत आहे. अजितदादा गटाचंही तेच होणार आहे, असं सांगतानाच भारतीय जनता पक्षाला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात परमोच्च आनंद मिळतोय. काल परवा ज्यांना चोर डाकू म्हणत होते, त्याचं टोळीत घुसून मलिदा खाण्याचे प्रवृत्ती पुढे आली काय? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.
दंगली घडू शकतात
दंगली कोण आणि का घडवत आहे हे आता उघड झालं आहे. सरकारला दाखवण्यासाठी कुठलेही काम राहिलं नाही. सगळे सर्व्हे त्यांच्या विरोधात जात आहेत म्हणून दंगली घडून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करत आहे. महाराष्ट्रात देखील दंगली घडू शकतात, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
ताकद कुणाची वाढली?
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने युतीची ताकद वाढल्याचा भाजपचा दावा आहे, असं विचारलं असता त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना फोडली तेव्हा त्यांना सत्तेत येण्याची शाश्वती नव्हती. आता अजितदादा आल्याने ताकत वाढली असे म्हणत असतील, तर ती ताकद कुणाची भाजप की अजितदादाची?, असा सवाल त्यांनी केला.
वैचारिक अध:पतन
मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल हा देशाचे गृहमंत्र्यांपेक्षा मोठा आहे. परंतु फ्लेक्सवर त्यांचे फोटो कार्यकर्त्यांसारखे खाली लावलेले आहेत. यातूनच वैचारिकतेचं अध:पतन झालेलं दिसून येतं. हे आता तिकडे जाऊन गुलाम होत आहेत. गुलाबांच्या लाईनीत जाऊन सगळे बसत आहेत हा माझा आरोप आहे, असंही ते म्हणाले.
भुजबळ ओबीसींचे राहिले नाहीत
वडेट्टीवार यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. भुजबळ भाजपसोबत जातील हे कोणालाच वाटले नव्हते. एवढेच काय भुजबळांच्या तोंडी मोदींच नाव येईल हे स्वप्नात ही वाटलं नव्हतं. सतेची लाचारी आहे, ते आता ओबीसींचे राहिले नाहीत. भविष्यात त्यांना राजकीय संकटांचा सामान करावा लागणार आहे, असंही ते म्हणाले.