Ashadhi wari 2022 : पालखी मार्गावर वारकऱ्यांना मिळणार बुस्टर डोस, अजित पवारांचे निर्देश; सतर्कता बाळगण्याचं आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चार दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.
देहू, पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी सोहळ्यात (Ashadhi wari 2022) कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस मिळणार आहे. विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे निर्देश दिले आहे. यंदा पालखी सोहळ्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. पालखी सोहळ्यादरम्यात पालखी मार्ग, पालखी तळ, रिंगण ठिकाणी पाणी, आरोग्य, स्वच्छतेसोबतच वारकरी भाविकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा किंवा बुस्टर डोस (Booster dose) घेतला नसेल तर पालखी सोहळ्यात तो देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे प्रसार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बुस्टर डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नवीन व्हेरिएंटचे रुग्ण
कोविडमुळे यंदा दोन वर्षांनंतर पायी वारी होत आहे. कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. मध्यंतरी रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. नवीन व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मास्कची सक्ती नसली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. वारकऱ्यांनीही यासर्व बाबींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, 21 जूनला माऊलींची पालखी आळंदीहून तर 20 जूनला तुकोबाराय महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवणार आहे.
बुस्टर डोससह इतर सुविधा
– शौचालय
– सॅनिटायझर, औषधे, डॉक्टर्सची पालखी मार्गावर व्यवस्था
– वारकऱ्यांसाठी मोबाइल अॅप
– लाइव्ह दर्शन
अजित पवारांनीही घेतला बुस्टर डोस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चार दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. मुंबई येथील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांना डोस देण्यात आला.