Prakash Ambedkar : आंबेडकर आणि ठाकरे यांचं अखेर ठरलं… सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारा निर्णय काय?
मी संभाजीराजे यांची माफी मागणार नाही. शाहू महाराज आदर्श आहेत. त्यांनी स्वतःला संपवायचा निर्णय घेतला असेल तर त्यांना लखलाभ. आरक्षण मिळणार नाही हे त्यांनी समाजाला सांगावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 19 ऑक्टोबर 2023 : महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटप कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीतील शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप झाल्यानंतर त्यांच्या मित्र पक्षांना जागा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आघाडीतील मित्र पक्षही या जागा वाटपाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
प्रकाश आंबेडकर हे पुण्यात मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर भाष्य केलं. ठाकरे गट आणि आमचं जागा वाटप झालं असं मी मानतो. बाकी आघाडीतील त्रिकुटाबाबत त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी परस्परच ठाकरे गटाबाबतचं जागा वाटप फायनल झालं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपावर भाष्य करतील असं सांगितलं जात होतं. कुणाला किती जागा मिळाल्या? कोण कुठून लढणार? निवडणूक अजेंडा काय असेल? प्रचाराला सुरुवात कधीपासून होईल? आदी माहिती या दोन्ही नेत्यांकडून पत्रकार परिषदेत दिली जाण्याची अपेक्षा होती. परंतु आंबेडकर यांनी परस्परच जागा वाटप झाल्याचं सांगून राजकीय धुरळा उडवून दिला आहे.
सत्ताधाऱ्यांना धसका
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाबरोबरचं जागा वाटप झाल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आंबेडकर आणि ठाकरे एकत्र लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या निर्णयामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्रात मोठी ताकद आहे. त्यांची मते निर्णायक असतात.
ज्यांच्या पारड्यात आंबेडकरांचा कौल जाईल तो पक्ष सत्तेत येऊ शकतो असं चित्र सध्या राज्यात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशी ठाकरे गटाने युती केली आहे. त्याचे परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
एक खासदार दिला
गेल्यावेळी वंचितची आघाडी एमआयएमसोबत होती. या युतीने संभाजीनगरातून एक खासदार निवडून आणला होता. अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. सोलापुरात प्रकाश आंबेडकरांनी चांगली मते घेतली होती. अकोल्यातही त्यांनी मोठी झेप घेतली होती. पण त्यांना यश आलं नव्हतं. आता प्रकाश आंबेडकर हे ठाकरे गटाबरोबर आल्याने त्याचा फायदा ठाकरे गटाला होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सरकार प्रामाणिक नाही
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकार प्रामाणिक नाही. सरकार खेळ करत आहे. मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्यांनी सत्ता भोगली, जे सत्तेत आहेत त्यांना चिंता आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
भांडण ऐतिहासिक
आरक्षण अशा पद्धतीने मिळणार नाही. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हे महत्वाचे आहे. कोर्ट डेटा आणा असं म्हणतंय. डेटा नाही म्हणून आरक्षण नाही असं कोर्ट म्हणतंय. एक विंडो ओपन आहे, मात्र त्या पद्धतीने जाणं गरजेच आहे. मराठा समाजातील भांडण हे ऐतिहासिक आहे. एकमेकांच्यात भांडण आहे. रयतेतला मराठा जोपर्यंत येत नाही तोवर आरक्षण अवघड आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.