Maharashtra Rain | महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना पुढच्या 24 तासांसाठी मोठा इशारा, हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती
हवमान विभागाने पुढच्या 24 तासांसाठी चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुणे | 20 जुलै 2023 : राज्यभरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून प्रचंड पाऊस पडतोय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, अमरावती जिल्ह्यांसह अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री अकरा वाजता मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे संपूर्ण गावावर दरड कोसळली. त्यामुळे मोठी जीवितहानी झालीय. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. असं असताना पाऊस अद्यापही सुरुच आहे. हवामान विभागाने पावसाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी पुढचे 48 तास म्हणजेच दोन दिवस महत्त्वाचे आहेत.
राज्यातील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या 48 तासात कोकण आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात पालघर, रायगड, ठाणे, सातारा आणि पुण्यात रेल अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून पाच दिवसांचं अंदाजपत्रक जाहीर
हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसाचे अंदाजपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पर्यटकांनी कोकण आणि घाट परिसरात येत्या काही दिवस जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुसळधार पावसाचं नेमकं कारण काय?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. कोकणासाठी पुढचे पाच दिवस जास्त महत्त्वाचे आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विशेषत: पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्यात घाट परिसरात एका दिवसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमधील अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पावसाचा अलर्ट
रेड अलर्ट – पुणे , पालघर , ठाणे ,रायगड , अतिमुसळधार पावसाचा अलर्ट
ऑरेंज अलर्ट – मुंबई , रत्नागिरी
यलो अलर्ट – सिंधुदुर्ग , सातारा , नाशिक , नंदुरबार , कोल्हापूर ,भंडारा , अकोला , अमरावती , बुलढाणा , चंद्रपूर , गडचिरोली