पुणे येथील ‘लैला’ला यूपी वॉरियर्सने का केले सल्लागार? काय आहे पुण्याशी संबंध
लिसाने आपल्या आयुष्यातील 12 वर्षे पुण्यातील अनाथाश्रमात घालवली. तिने 7 जुलै 2022 रोजी तिच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केले, ज्यामध्ये तिने लिहिले की 12 वर्षांनंतर त्याच अनाथाश्रमात येणे खरोखरच भावस्पर्शी क्षण आहे.
पुणे : देशात महिला प्रीमियर लीग (women’s premier league) 4 ते 26 मार्च दरम्यान मुंबईत होणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर एकूण 22 सामने होणार आहेत. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव 13 फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये लखनौ फ्रँचायझीचा संघ यूपी वॉरियर्स या नावाने खेळणार आहे. यूपी वॉरियर्सने पुण्याच्या अनाथाश्रमातील ‘लैला’ला आपला सल्लागार बनवलंय. त्यानंतर ही लैला चर्चेत आली. कोण आहे ही लैला. लैला म्हणजे लिसा स्थलेकर. आता तुम्हाला नाव ऐकल्यासारखे वाटले असले. होय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळलेली लिसा…तिच लैला आहे. पाहूया काय आहे तिची स्टोरी.
काय आहे पुण्याचा संबंध
2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लिसा स्थालेकरने कॉमेंट्री करिअरची निवड केली. लिसाने आपल्या आयुष्यातील 12 वर्षे पुण्यातील अनाथाश्रमात घालवली. तिने 7 जुलै 2022 रोजी तिच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केले, ज्यामध्ये तिने लिहिले की 12 वर्षांनंतर त्याच अनाथाश्रमात येणे खरोखरच भावस्पर्शी क्षण आहे. ती 12 वर्षाची असताना पुण्यातील अनाथाश्रमात होती. तेव्हा अनाथश्रमात असलेले कर्मचारी आजही आहे.
लैला बनली लिसा
लिसाला तिच्या जन्मदात्यांनी पुण्यातील श्रीवत्स अनाथाश्रमासमोर सोडून दिले होते. त्या अनाथश्रमात लिसाचे नाव लैला ठेवण्यात आले होते. कालांतराने भारतीय वंशाचे डॉक्टर हरेन आणि त्यांची इंग्रज पत्नी स्यू यांनी लैला दत्तक घेतले. त्यावेळी ती 12 वर्षांची होती. त्यांनी तिला नवे नाव दिले ते म्हणजे लिसा स्थलेकर. सध्या लिसाचे वय 42 वर्षे आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकटमध्ये पदार्पण
लिसाने ऑस्ट्रेलियाकडून 2001 मध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.आतापर्यंत ती आठ कसोटी, 125 एकदिवसीय आणि 54 टी-20 सामने खेळली आहे. एकदिवशीय सामन्यात तिने 2 हजार 728 धावा केल्या. तसेच 146 विकेट्सही घेतल्या. अनेक विक्रमही तिच्या नावावर आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) आयोजित केलेल्या लिलावात यूपी वॉरियर्सला कॅप्री ग्लोबल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडने 757 कोटी रुपयांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियन महिला संघाला चार वेळा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या लिसा स्थलेकरला सल्लागार बनवण्यात आले आहे.
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जॉन लुईस यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजू जैन या सहाय्यक प्रशिक्षक असतील.