राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा प्रसार करतात, ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांचं वक्तव्य
राजकारणात पुष्कळ अंधश्रध्दा असून राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा प्रसार करतात. त्यात त्यांचे हित आहे, असं मत ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी व्यक्त केलं.
पुणे : “सर्व धर्ममार्तंड हे समाजव्यवस्थेच्या धुरीणांचे चाकर असतात. त्यांच्या मदतीने हे धुरीण अंधश्रद्धांचा फैलाव करतात. लोकांनी विचार करणे, प्रश्न विचारणे हे व्यवस्थेच्या धुरीणांना अडचणीचे असते. त्यामुळे लोकांची विचारशक्ती हे धुरीण नष्ट करतात आणि मग लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नव्याने सुरू केलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या ई-मासिकाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात डॉ. यशवंत मनोहर बोलत होते (Writer Yashwant Manohar say politicians spread superstition).
डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, “राजकारणात पुष्कळ अंधश्रध्दा असून राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा प्रसार करतात. त्यात त्यांचे हित आहे. अंधश्रद्धा हा एक धर्ममान्य आणि लोकमान्य धंदा बनला असून ते बुद्धी चुकार लोकांचे विश्रामगृह आहे. आळशी लोकांसाठीचे ते आयोजन, तत्वज्ञान, शॉर्टकट आहे. माणूस भयग्रस्ततेने परावलंबी होऊन बुद्धिपासून दूर जातो. मात्र विचार करणारी बुद्धी ही मानवी अस्तित्वाचे सत्व आहे. ते सत्व गमावले की माणूस म्हणून जगण्यासारखे व्यक्तीकडे काही रहात नाही.”
“मानसिकदृष्ट्या रुग्ण असलेला समाज जगण्याला पारखा झालेला असतो. अशा समाजाला स्वास्थ्येपूर्ण जगता येत नाही. त्यामुळे समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम आणि त्यांच्या मासिकातील चर्चाविश्व समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्र अंनिसचे काम हे देशाच्या मानसिक आरोग्यासाठीचे अभियान आहे,” असं डॉ. यशवंत मनोहर यांनी सांगितलं.
“श्रद्धा – अंधश्रद्धेत फरक नाही”
डॉ. मनोहर म्हणाले, “श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काहीही फरक करता येत नाही. तर्काला मूठमाती दिल्यावर श्रद्धा जन्माला येते आणि तर्काची हत्या केल्यावर अंधश्रद्धा जन्माला येते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा तर्क, विज्ञान, बुद्धीप्रामाण्याला मानत नाहीत. त्यामुळे हे दोन्हीही एकच आहे.”
अध्यक्षीय मनोगत महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी मासिकाचे संपादक डॉ. नितीन शिंदे, कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड, डॉ. दीपक बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मांतेश हिरेमठ यांनी सुत्रसंचलन केले, राजेंद्र फेगडे यांनी आभार मानले, तर अवधूत कांबळे यांनी संयोजन केले. हरिदास तम्मेवार, प्रमोद गंगणमाले, सुशीला मुंडे, रंजना गवांदे, दर्शना पवार, कृष्णा चांदगुडे, नंदकिशोर तळाशीलकर, माधव बावगे, ठकसेन गोराणे, मच्छिन्द्रनाथ मुंडे, सुयश तोष्णीवाल, सुदेश घोडेवार, सुरेखा भापकर, विनायक सावळे, विशाल विमल, कल्पना बोबे, सुदेश बालगुडे, एकनाथ पाटील आदींनी या मासिकात लेखन केले आहे.
हेही वाचा :
“सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याला 4 वर्ष पूर्ण, सरकार अंमलबजावणी कधी करणार?”
मंत्री संजय राठोड प्रकरणात समाजाची ढाल पुढे करुन जात पंचायत सक्रिय, अंनिसचा गंभीर आरोप
इंदोरीकर महाराजांविरोधात अंनिसनेही दंड थोपटले, कोर्टात सरकारी वकिलांसोबत अंनिसचा वकीलही युक्तिवाद करणार
व्हिडीओ पाहा :
Writer Yashwant Manohar say politicians spread superstition