पवार घराण्यातील नवा वारसदार राजकारणात?; कोण आहेत युगेंद्र पवार?
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे पवार घराण्यातील लोकही राजकीयदृष्ट्या विभागल्या गेले. अजितदादा यांच्या बंडानंतर त्यांचे चिरंजीव पार्थ पवार त्यांच्यासोबत राहिले. तर शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि रोहित पवार राहिले. आता पवार घराण्यातील आणखी एक तरुण चेहरा शरद पवार यांच्या साथीला येणार आहे. युगेंद्र पवार असं या नव्या आश्वासक चेहऱ्याचं नाव आहे. कोण आहेत युगेंद्र पवार?
बारामती | 23 डिसेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन घराण्यांचा मोठा दबदबा आहे. एक म्हणजे ठाकरे घराणं आणि दुसरं पवार घराणं. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी समाजकारण आणि राजकारणात आहे. तर पवार घराण्यातील चौथी पिढीही राजकारणात सक्रिय आहे. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार आणि नातू रोहित पवार तसेच पार्थ पवार सक्रिय राजकारणात आहेत. आता पवार घराण्यातील आणखी एक वारसदार राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव हे अजितदादांच्या गटात जाणार नाहीत. तर आजोबांना साथ देणार आहेत. त्यामुळे पवार घराण्यातील हा नवा वारसदार कोण? अशी चर्चा रंगली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बारामतीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. युगेंद्र पवार यांनी हे आयोजन केलं आहे. या स्पर्धेचे बारामतीत भव्य पोस्टर्स लागले आहेत. त्यावर शरद पवार आणि युगेंद्र यांचेही फोटो आहेत. त्यामुळे युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
पोस्टरमुळे चर्चा
युगेंद्र पवार हे बारामतीत अत्यंत सक्रिय आहेत. बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी युगेंद्र यांच्याकडे आहे. त्याशिवाय विविध पदावर युगेंद्र काम करत आहेत. तसेच बारामतीतील सामाजिक कार्यक्रमातही युगेंद्र हे सक्रिय असतात. त्यामुळे युगेंद्र हे लवकरच राष्ट्रवादीत सक्रिय होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आजच्या कुस्ती सामन्याच्या आयोजनामुळे ही चर्चा अधिकच रंगली आहे.
मोठी जबाबदारी मिळणार?
युगेंद्र पवार हे नेहमीच शरद पवार यांच्यासोबत असतात. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र हे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांना भेटायला गेले होते. युगेंद्र पवार सातत्याने शरद पवार यांच्यासोबत असल्याने त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. पण युगेंद्र राजकारणाची सुरुवात कुठून करणार याची स्पष्टता नाही. युगेंद्र राजकारणात आल्यास त्यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे युगेंद्र कधी राजकारणात प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी असल्याचं सांगितलं जात आहे. ते चांगले संघटक असल्याचंही सांगितलं जात आहे. तरुणांना राजकारणात आणण्यासाठी युगेंद्र यांचे नेहमीच प्रयत्न असतात. शरयू अॅग्रोचे ते सीईओ आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत. तसेच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी सातत्याने आजोबांना साथ दिली आहे. शरद पवार यांचे फोटो, व्हिडीओ, भाषणं सातत्याने सोशल मीडियावर शेअर करून आजोबांची बाजू जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.