लोकसभेच्या रणांगणात नणंद असो की सासरे पूर्ण ताकदीने उतरणार…रक्षा खडसेंनी स्वीकारले आव्हान
Raver and Jalgaon lok sabha election 2024| आता समोर सासरे असो की नणंद पूर्ण ताकदीने आम्ही मैदानात उतरणार आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी कुठेही कमी पडणार नाही, असे भाजप उमेदवार आणि विद्यामान खासदार रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले.
रवी गोरे, जळगाव | 14 मार्च 2024 : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात विद्यामान भाजप खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात स्वत: एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. यामुळे बारामतीप्रमाणे रावेर लोकसभा मतदार संघातील लढत परिवारात होणार आहे. सासरे विरुद्ध सून किंवा नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगणार आहे. त्यावर भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी भाष्य केले आहे. लोकसभेच्या रणांगणात नणंद असो की सासरे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे रक्षा खडसे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना म्हटले आहे.
नाराजी नाही, सर्वच एकत्र
आपल्या उमेदवारीनंतर मतदार संघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. काही जणांनी राजीनामे देण्याची तयारी केली आहे? या प्रश्नावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, मतदारसंघात कुठलीही नाराजी नाही. सर्वांनी मला एक विश्वास दिला आहे. निवडणुकीत कोणतेही कमतरता भासू देणार नाही. जास्तीत जास्त मतांनी आपल्याला निवडून देऊ. स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव तथा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी आणि कार्यकर्त्यांनी हा विश्वास दिला आहे.
समोर कोणीही असले तरी पूर्ण तयारी
रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहिणी खडसे किंवा एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की, आता समोर सासरे असो की नणंद पूर्ण ताकदीने आम्ही मैदानात उतरणार आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी कुठेही कमी पडणार नाही.
एकनाथ खडसे भेट झाली का?
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाथाभाऊ आणि घरातील सर्वांनी मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. नाथाभाऊंनी मला आशीर्वाद दिला आहे. पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत. आता आमचे नेते गिरीश महाजन आल्यानंतर मी त्यांची भेट घेईल. त्यानंतर प्रचाराची रणनीती ठरवली जाईल. ते जे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही सर्व काम करू, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.