Nashik| ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपकडून महापालिकेत 2632 पदांची नोकर भरती
नाशिकमध्ये फेब्रुवारीत महापालिकेची निवडणूक होत आहे. त्या दृष्टीने सत्ताधारी भाजपची पावले पडत असून, घोषणांचा बार उडवणे सुरू आहे.
नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपने महापालिकेत 2632 पदांवर नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या महासभेत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात पालिकेची निवडणूक आहे. त्यापूर्वी भाजपने विविध विकासकामांसाठीही जोर लावला आहे. त्यावरही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडून लांगुलचालन सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. सोबतच विरोधकांनी आस्थापना खर्च, सेवा प्रवेश नियमावली याबाबत प्रश्न निर्माण केला आहे.
अपुरा कर्मचारी वर्ग
नाशिक महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. मात्र, कर्मचारी भरती झालेली नाही. अनेक कर्मचारी निवृत्त होत आहेत. एकीकडे शहर झपाट्याने वाढले आहे. पाणीपट्टी, घरपट्टी वसूल करायलाही कर्मचारी मिळत नाहीत. कर्मचारी कमी असल्याचा परिणाम शहराचा विकास आणि नागरी सेवांवर होत आहे. त्यामुळे महापालिकेत मानधनावर कर्मचारी भरती करा, अशी मागणी स्थायी समिती सभापती गणेश गीते आणि इतर सदस्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे पत्र देऊन केली होती. त्यानंतर नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला.
विरोधक आक्रमक
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नोकर भरतीचा प्रस्ताव मांडल्याने विरोधक आक्रमक झाले. काँग्रेस नगरसेविका हेमलता पाटील, गजानन शेलार, शाहू खैरे, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, विरोधी पक्षनेते अजय बारस्ते यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतला. मात्र, या आक्षेपालाही सत्ताधाऱ्यांनी जोरदार विरोध केला. स्वतः महापौरांनी विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. हा शहराच्या विकासाचा मुद्दा आहे. त्यात खीळ घालू नका, असे आवाहन सतीश कुलकर्णी यांनी केले. मोठ्या गदारोळात या नोकरभरतीला मंजुरी देण्यात आली.
सारी काही राजकीय गणिते
नाशिकमध्ये फेब्रुवारीत महापालिकेची निवडणूक होत आहे. यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. आता फेब्रुवारी महिन्यात होणारी नाशिक महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्यात येत आहे. त्या दृष्टीने सत्ताधारी भाजपची पावले पडत आहेत.
VIDEO : Pune | CNG Price Hike : पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किलोमागे मोजावे लागणार इतके रूपये – tv9#cng #CNGprice #Hike #Pune pic.twitter.com/cRg4CZkkRJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021
इतर बातम्याः
Controversial Health Exam: तक्रारींच्या निराकरणानंतरच नियुक्त्या; आरोग्य मंत्र्यांचे आदेश