Rashmi Thackeray Brother: ही तर हुकूमशाहीची खतरनाक सुरुवात, पाटणकरांवरील कारवाई म्हणजे ठाकरे कुटुंबावरील हल्लाच; राऊतांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅट्स ईडीने जप्त केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांचे 11 फ्लॅट्स ईडीने जप्त केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाटणकरांवरील कारवाई म्हणजेच ठाकरे कुटुंबावरील हल्ला आहे. महाराष्ट्र ठाकरे कुटुंबाला ओळखतो. याची किंमत आज ना उद्या तुम्हाला चुकवावी लागेलच, असा इशारा देतानाच ईडीच्या कारवाई ही तर खरतनाक हुकूमशाहीची सुरुवात आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी चढवला आहे. श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी भाजप सरकारवर संताप व्यक्त करतानाच भाजपला सज्जड इशाराही दिला आहे.
एखाद्या राज्यात हरलो असेल तर ज्यांनी पराभव केला त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे. ईडीच्या कारवाईची संसदेत कालच माहिती आली आहे. ईडीच्या कारवायांबाबत सर्वाधिक कारवाया या ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नाही तिथे झाल्या आहेत. यूपीएच्या 11 वर्षाच्या काळात 22 किंवा 23 कारवाया झाल्या. पण मोदी सरकारने 2500 कारवाया केल्या. त्यातील काही कारवाया चुकीच्या पद्धतीने होत्या. नंतर न्यायालयात ते स्पष्ट झालं. न्यायव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, या हुकूमशाही प्रवृत्तीच्या गुलामासारखं वागत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पाटणकर हे आमच्या कुटुंबाचेच सदस्य
श्रीधर पाटणकर हे आमच्या कुटुंबातील सदस्य आहे. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा रश्मी ठाकरेपर्यंत मर्यादित नाहीत. ते आमच्या सर्वांच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. ईडीने त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. झारखंड, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात या ठिकाणीच जोरदार कारवाई सुरू आहे. गुजरात आणि इतर राज्यात ईडीने कार्यालय बंद केलेत वाटतं. गुजरातमध्ये सर्वात मोठा शिपयार्ड घोटाळा बाहेर आला. आतापर्यंत एकाही आरोपीला शिपयार्ड घोटाळ्यात अटक झाली नाही. त्यांची चौकशी झाली नाही. अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीलाही त्रासा दिला जात आहे. पण बंगाल आणि महाराष्ट्र झुकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
तर तुरुंगात जाऊ
ही हुकूमशाहीची खतरनाक सुरुवात आहे. चार राज्यात जिंकलात म्हणून तुम्ही देशाचे मालक बनला नाही. आम्हाला तुरुंगात टाकायचे असेल तर तयारी करा आम्ही तुरुंगात जाऊ. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
कोण आहेत श्रीधर पाटणकर ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय? मुख्यमंत्र्यांचे थेट नातलग?