Sanjay Raut: चोमडेपणा करू नका, चंद्रकांत पाटील काय शिवाजी महाराजांचे वशंज आहेत का?; संजय राऊत भडकले
Sanjay Raut: आमच्यासाठी संभाजीराजेंचा विषय संपला आहे. संजय पवारांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यावर कोल्हापुरातील सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
कोल्हापूर: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati} आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील बाहेर आला. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली होती. चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील कोण? ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? त्यांनी 2019 ला मोडलेल्या शब्दाचा खुलासा करावा. शब्द मोडण्याची परंपरा कुणाची आहे? शब्द कोणी मोडला? फसवलं कुणी? इतरांनी चोमडेपणा करू नये. या सर्व प्रकरणात त्यांचा काय संबंध आहे? हा आमचा प्रश्न आहे, असं संजय राऊत म्हणाले. भाजपला एवढंच वाटत असेल तर त्यांनी त्यांची 42 मते संभाजीराजेंना द्यावीत. त्यांना आम्ही उत्तरं का द्यायचं? आमच्या पक्षातील प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनाही उत्तर का द्यायचं? फडणवीस आमच्या पक्षात येणार आहेत का?, असा सवाल राऊत यांनी केला.
संजय राऊत दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आमच्यासाठी संभाजीराजेंचा विषय संपला आहे. संजय पवारांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यावर कोल्हापुरातील सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या मालकीचे नाहीत. ते सर्व देशाचे आणि विश्वाचे आहेत, असं राऊत म्हणाले.
बंददाराआड एवढंच घडलं
मुख्यमंत्र्यांच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न निर्माण करणं चुकीचं आहे. ती शिवसेनेची जागा आहे. शिवसेनेचा उमेदवार आणायचा हे आधीच ठरलं आहे. पुरस्कृत उमेदवार करायचा की नाही हे माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून सांगेल, असं मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितल्याची माझी माहिती आहे. मुख्यमंत्री इतकेच बोलले. हा विषय संपला आहे. राजेंनी मन मोकळं केलं आहे. जाऊ द्या. 42 मतांचा विषय होता. तुम्हाला राजकारणात करिअर करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या तरी पक्षाचा हात धरावा लागतो. महाराणा प्रतापांचे वशंज सुद्धा राजकारणात आहेत. प्रत्येकांचे कुठे तरी राजकीय लागेबांधे आहेत. आम्ही विनंती केली. त्यांनी स्वीकारली नाही, असंही राऊत यांनी सांगितलं.
पटोलेंनी 42 मते द्यावीत
शिवेंद्रराजेंनी किती पक्ष बदलले? त्यांना राजकीय पक्षांचं वावडं आहे का? नाही ना? त्यांच्या घराण्यात कोण कुठकुठल्या पक्षात आहे हे शिवेंद्रराजेंनी पाहावं, असं सांगतानाच आम्हाला संभाजी छत्रपतींविषयी आदर आहे. त्यांच्या गादीविषयी आदर आहे, असं ते म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये. हा आमचा प्रयत्न आहे. दुसऱ्या जागेसाठी 42 पेक्षा जास्त मतं आमच्याकडे आहेत, असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली. नाना पटोले यांनी आपली 42 मते संभाजीराजेंना द्यावीत. त्यांना निवडून आणावे, असा टोलाही त्यांनी लगावला.