‘1994 चं ओबीसी आरक्षण कोणत्या आधारावर?’, उदयनराजे भोसले यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा
मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केलाय. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारकडून जे प्रयत्न करण्यात आले त्यावरही टीका केलीय. त्यानंतर आता उदयनराजे भोसले यांनी छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या 1994 च्या अध्याधेशावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
सातारा | 8 नोव्हेंबर 2023 : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय. “समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्ये टाळा”, असं आवाहन खासदार उदयनराजे भोसेल यांनी केलंय. “1994 ला दिलेलं आरक्षण कोणत्या आधारावर दिलं?”, असा सवाल उदयनराजेंनी केलाय. “सर्वसामान्य नागरीक कुठल्याही जातीचा असला तरी त्याला मदत करणं हे शासनाचं कर्तृत्व आहे. कुणीही वंचित राहायला नको. प्रत्येक वेळेस, मराठा आरक्षणाचा विषय निघतो त्यावेळेस ते म्हणतात की, हे झाल्याशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. निवडणुका घ्या, नका घ्या. त्याचा काही संबंध नाही. पण आपली पुढची पिढी यावर तोडगा काढला नाही तर कुणालाही माफ करणार नाही. त्यांचं कुणाचं हिसकावून घ्या आणि ह्यांना द्या, अशातला भाग नाही”, असं उदयनराजे म्हणाले.
“कोणताही ठराव नाही, काही नाही. मागेसुद्धा अनेकदा सांगितलं होतं. तुम्ही व्हाईट पेपर काढा. 23 मार्च 2994 ला एक साधा फुलस्केपवर टायपिंग करुन नोटीफिकेशन काढलं आणि तुम्ही आरक्षण देऊन टाकलं. त्याला आधार कुठला?”, असा सवाल उदयनराजेंनी केला. “आता ठीक आहे ना. दर दहा वर्षांवी जनगणना झाली पाहिजे”, असं मत उदयनराजे भोसले यांनी मांडलं.
‘कुणाकडे बघणार तुम्ही?’
“पुढारी लोकं, मी पुढारी नाही. हे लोकं म्हणतात ना, चेतावणी देतात, आम्ही बघून घेऊ, कुणाकडे बघणार तुम्ही? लोकं तुमच्याकडे बघतात की, तुमच्याकडून काहीतरी न्याय मिळावा. पण तुम्ही म्हणतात की, बघून घेऊ. तुम्ही आज पदावर बसला आहात ते फक्त समाजामुळे आहात. कुठलाही आमदार, खासदार, मंत्री असेल. जनतेच्या विश्वासाला पात्र राहणं गरजेचं आहे. तुम्ही सरळ सांगता की, त्यांना दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरु. म्हणजे जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कशाकरता?”, असं म्हणत उदयनराजे यांनी भुजबळांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
‘रक्त कोणाचेही असू द्या ते स्वस्त नसतं’
“पंढरपूरचे दोन युवक आज मला भेटण्यासाठी आले आहेत. त्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र आज दिले आहे. रक्त कोणाचेही असू द्या ते स्वस्त नसतं. रक्त हे जीवदान देण्यासाठी काम करतं. मराठा आरक्षणावरून जो वादविवाद चालू आहे, प्रत्येकाने या विषयी विचार करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी भेदभाव केला नाही. इकॉनोमीकली बॅकवर्ड क्लास म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल, म्हणजे कोणत्याही जातीतला असला तरी त्याला शासनाचं मदत करण्याचं काम आहे. कोणीही वंचित राहिला नको. निवडणुका घ्या आगर घेऊ नका. मात्र मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही तर पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही”, असं उदयनराजे म्हणाले.
‘तुम्ही जाती-जातीत भांडण लावत आहात’
“दर दहा वर्षांनंतर जनगणना झाली पाहिजे. पुढाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही ज्या पदावर आहात ते समाजामुळे. काहीजण म्हणतात की मराठ्यांना आरक्षण दिलं की आम्ही रस्त्यावर उतरू. याचा अर्थ असा होतो की तुम्ही जाती-जातीत भांडण लावत आहात”, असा आरोप उदयनराजेंनी केला.
‘तर तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय समाज गप बसणार नाही’
“जनगणना करून लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्या. जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत इलेक्शन घेऊ नका. कोर्ट कचेऱ्या दाखवण्यापेक्षा जनगणना करा. तुम्ही राज्यकर्त्यांना हात जोडून विनंती, सर्व समाजाला सन्मानाने वागणूक दिली तर तुमचा सन्मान होईल. पण चुकीची वागणूक दिली तर तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय समाज गप बसणार नाही”, असा इशारा उदयनराजेंनी दिला.
“मराठा समाजात जर आरक्षणावरून आत्महत्या झाल्या तर याला सरकार जबाबदार राहील. एक महिना, दोन महिने, तीन महिने प्रत्येकाचं वय वाढत चाललं आहे. कृपया हात जोडून विनंती करतो, मी कोणत्याही द्वेषापोटी बोलत नाही. महाराष्ट्रातील सर्व समाजातील जनतेला न्याय देण्याचे काम करा”, असं आवाहन उदयनराजेंनी केलं.