पाच वर्षांपूर्वी मी चूक केली, माफी मागतो….शरद पवार कोणती चूक केली मान्य
amravati lok sabha constituency: मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा, असे सांगितले. आता ती चूक दुरुस्त करायची आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजकीय मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या विरोधात शरद पवार राज्याचे दौरे करत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत शरद पवार यांनी माफी मागितली. पाच वर्षांपूर्वी मी एक चूक केली होती. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. मागच्या वेळी एक चूक माझ्याकडून झाली अन् नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. आता ती चूक कधी होणार नाही. ती चूक दुरुस्त करणार आहे. आता बळवंत वानखडे यांना विजयी करा, हे सांगायला मी आलो आहे, असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले.
देशावर संकट दिसत आहेत…
गेले काही दिवस उद्धव ठाकरे मी स्वत: आमचे आघाडीचे सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपली भूमिका मांडत आहेत. जे काही संकट देशावर दिसत आहे, त्यातून कशी मुक्तता होईल याचा विचार मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या ठिकाणी आल्यावर मला अनेक जुन्या गोष्टी आठवतात. सार्वजनिक जीवनात कामाला सुरुवात केल्यानंतर मी तरुणांच्या चळवळीत सहभागी झालो. महाराष्ट्रभर फिरलो. पण अमरावती असं ठिकाण होतं तिथून तरुणांची एक शक्ती उभी राहिली आणि आम्हा सर्वांना काम करण्यासाठी अमरावतीकरांनी प्रोत्साहन दिलं.
ती चूक दुरुस्त करण्यासाठी आलोय…
आज या ठिकाणी मी आलोय ती एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला, खासदार केलं. पण गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. कधी तरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं आमच्याकडून चूक झाली. ती चूक पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे. ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचं सार्वजिनक आणि व्यक्तिगत जीवन स्वच्छ आहे. अशा बळवंतराव वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे.
देशाची सत्ता गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. गेल्या ५६ वर्षांत अनेकांना मी जवळून पाहिले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्यासोबत काम केले. या सर्वांच्या कामाची पद्धत पाहिली आहे. ती लोक देशाच्या कानाकोपऱ्यात जायचे. भाषणं करायचे. नवा भारत कसा उभा राहील लोकांचा आत्मविश्वास कसा वाढेल याचं काम ते करायचे. आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा नेहरूंवर टीका करतील. काँग्रेसवर टीका करतील.