बुलढाण्यात केस गळतीच्या आजाराचा संसर्ग वाढला, एकाच कुटुंबातील चार-चार जणांना पडलंय टक्कल
बुलढाण्याील शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये केस गळतीचा आजार दिवसेंदिवस फोफावत जाताना दिसत आहे. या केस गळतीमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण या आजाराने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात केस गळतीमुळे अनेकांना टक्कल पडत आहे. या संसर्गजन्य आजाराने आता चांगलेच डोकेवर काढले आहे. केस गळतीच्या या संसर्गजन्य आजाराने अनेकांना ग्रासले असून आरोग्य विभागाला अद्याप केस गळतीचे प्रमुख कारण सापडले नसल्याने बाधित गावात मोठी दहशत पसरली आहे. तब्बल 11 गावातील लोकांना या केस गळतीच्या संसर्गाने ग्रासले आहे. केस गळतीच्या रुग्णात देखील झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भोंनगाव येथील भिकाजी मोरखडे यांच्या कुटुंबातील 3 जणांचे टक्कल पडले आहे. त्यात लहान मुलांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने सुरुवातीला त्यांना गोळ्या दिल्या होत्या, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आज पुन्हा त्यांची तपासणी केली असून नमुने घेतले आहेत.
केस गळतीच्या आजाराचा शोध घेण्यात आरोग्य विभाग अपयशी पडताना दिसत आहे. जोपर्यंत केस गळतीचे नेमके कारण सापडत नाही तोपर्यंत गावकऱ्यांनी गावातील बोअरवेल आणि विहिरीचे पाणी वापरू नये, अशी सूचना आरोग्य विभागाने गावकऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नेमकं असं काय घडलं की केस गळत आहेत? ते समजायला मार्ग नाही. डॉत्करांनादेखील ते समजत नसल्याने अनेक जण चिंतेत आहेत. आता या प्रकरणात आरोग्य विभागाकडून कशाप्रकारे परिस्थिती हाताळली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
आरोग्य विभागाची मोठी टीम गावात दाखल
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावसह अनेक गावांमध्ये केस गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र या केस गळतीचे नेमके कारण काय? त्याचा थांगपत्ता अद्याप लागत नसल्याने गावकऱ्यांनी गावातील दूषित पाणी वापरू नये, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आज अकोला मेडिकल कॉलेज आणि बुलढाणा जिल्ह्याची आरोग्य विभागाची एक मोठी टीम या गावात दाखल झाली होती. गावकऱ्यांच्या केस, रक्त, तसेच त्वचेचे नमुने पुन्हा एकदा या टीमने गोळा केली आहेत. त्यामुळे पुढचे आठ दिवस तरी या नमुन्यांचे परीक्षण अहवाल प्राप्त होण्यास लागतील. त्यामुळे तोपर्यंत गावकऱ्यांनी गावातील दूषित पाणी वापरू नये, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.