श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा; कोणत्या सोयीसुविधा मिळणार?
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वतव्यवस्था समितीचे अध्यक्ष आशुतोष अशोक काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
मुंबईः शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वतव्यवस्था समितीचे अध्यक्ष आशुतोष अशोक काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना या पदासाठी असणाऱ्या साऱ्या सोयीसुविधा या राज्यमंत्र्याप्रमाणे मिळणार आहेत. तशी अधिसूचनाही राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना प्रतिमहिना 7500 रुपयांचे मानधन आणि इतर खर्चही मिळणार आहे.
कोण आहेत आशुतोष काळे?
शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार आशुतोष काळे यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळावर काँग्रेसचे डॉ. एकनाथ गोंदकर, डी. पी. सावंत, सचिन गुजर, राजेंद्र भोतमागे, नामदेव गुंजाळ, संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे आशुतोष काळे, जयंत जाधव, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, संदीप वर्पे, अनुराधा आणि शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. 35 वर्षीय आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र, तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू आहेत. त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची धुरा आहे. आता त्यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.
या सोयीसुविधा मिळणार
– महिन्याकाठी साडेसात हजारांचे मानधन. समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रत्येक बैठकीमागे 500 रुपयांचा भत्ता.
– दर महिन्याला 3000 रुपयांपर्यंतचा दूरध्वनी खर्च मिळणार आहे.
– कार्यालयीन कामासाठी वाहन सुविधेवरील खर्चही देण्यात येणार आहे. त्यात समितीने वाहन दिल्यास इंधन खर्च म्हणून प्रतीवर्ष 72000 हजार रुपये मिळतील.
– अध्यक्षांनी स्वतःचे वाहन वापरल्यास त्यांना दरमहा 10000 रुपये मिळतील.
– संचालक मंडळाच्या बैठकीनिमित्त मुंबईला गेल्यास प्रतिदिन 750 रुपयांचा खर्च मिळेल.
– नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक येथे गेल्यास प्रतिदिन 500 रुपयांचा खर्च मिळेल. इतर ठिकाणी गेल्यास प्रतिदिन 350 रुपयांचा खर्च मिळेल.
– अध्यक्षांना नियमाप्रमाणे दैनिक भत्ता मिळेल. कार्यालयीन कामासाठी एक स्वीय सहायक, एक लिपिक, एक शिपाई हे कर्मचारी असतील.
– समितीच्या दौऱ्यात शासकीय विश्रामगृहावर मुक्कामाची सोय असेल. यावेळी वाहनाची सुविधा असेल. मात्र, इतर ठिकाणी समितीच्या निधीमधून निवासस्थानाची सोय उपलब्ध करून दण्यात येणार नाही.
– शासकीय समारंभात राज्यमंत्र्यांनंतरचे त्यांचे स्थान असेल.
इतर बातम्याः
Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?