सोलापुरात महिलेसह 2 चिमुकल्यांची कोरोनावर मात, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घरी रवानगी
सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक दिलासादायक बातमी (Solapur Corona Update) समोर आली आहे. सोलापुरात एका कोरोनाबाधित महिलेसह तिच्या दोन लहान मुलांनी कोरोनावर मात केली आहे.
सोलापूर : सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक दिलासादायक बातमी (Solapur Corona Update) समोर आली आहे. सोलापुरात एका कोरोनाबाधित महिलेसह तिच्या दोन लहान मुलांनी कोरोनावर मात केली आहे. या महिलेला आपल्या मुलांसह रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या महिलेची पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत घरी रवानगी करण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत महिलेचं स्वागत केलं (Solapur Corona Update).
कोरोनावर मात केलेल्या या महिलेचा रिपोर्ट 12 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेच्या दोन लहान मुलांचीदेखील तपासणी करण्यात आली. त्या दोघी मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे त्या तिघांवर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान 14 दिवसांच्या कालावधीनंतर महिला आणि तिच्या लहान मुलांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला. अखेर आज (30 एप्रिल) या महिलेला आपल्या दोन्ही मुलांसह डिस्चार्ज देण्यात आला.
सोलापुरात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 81 वर पोहोचली आहे. यापैकी 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. ज्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत त्याभागात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय या भागातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
राज्यभर आणि देशात कोरोनाचं थैमान सुरु असताना सोलापुरात सुरुवातीला कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वी सोलापुरातील तेलंगी पाछा पेठ परिसरात एका किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉजिटिव्ह आला. या दुकानदारामार्फतच सोलापुरात कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे त्याच्या संपर्कातील लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यात एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तिच्या संपर्कातील इतर व्यक्तींचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
संबंधित बातमी :
भवानी पेठेत 266, ढोले पाटील रोडवरही दोनशेपार कोरोनाग्रस्त, पुण्याच्या कोणत्या प्रभागात किती?