अजितदादांचा वाढदिवस, कार्यकर्त्यांचा जल्लोष, शहाजी बापू पाटलांच्या पत्नीला पाठवली आठ हजारांची साडी, नेमकी भानगड काय? वाचा…
सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आमदार शहाजी बापू पाटलांना त्यांच्या पत्नीसाठी पाठवली रेशमी इरकल साडी
सोलापूर : आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा (Ajit Pawar Birthday) आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त राज्यभर राष्ट्रवादीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई पुण्यासह सोलापूर, बारामतीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोलापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी अजित पवारांचा वाढदिवस साजरा केला. पण यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी जी कृती केली त्यामुळे सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. दादांच्या वाढदिवशी त्यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) यांच्या पत्नीला साडी पाठवली. रेशमी इरकल साडी त्यांनी पाठवली आहे. तीही आठ हजारांची… या साडीची अन् या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भलतीच चर्चा आहे.
बापूंच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून भेट!
राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी दादांच्या वाढदिवशी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पत्नीला साडी पाठवली. रेशमी इरकल साडी त्यांनी पाठवली आहे. तीही आठ हजारांची… या साडीची अन् या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भलतीच चर्चा आहे. शहाजीबापू पाटलांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात ते मला बायको साडीही घेणं जमलं नाही, असं म्हणत होते. त्यामुळे आम्ही ही साडी देत असल्याचं राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी म्हटलंय.
“बायकोला लुगडं घेऊ शकलो नाही”
1995 नंतरही येणारी प्रत्येक निवडणूक शहाजीबापू पाटील हे गणपतरावांविरोधात लढत राहिले. मात्र त्यांना यश मिळालं नाही. या अनेक वर्षांच्या सत्ता संघर्षात बापूंना आपल्या संपत्तीतील अनेक गोष्टी विकाव्या लागल्याचेही बोलले जाते. कारण आमदारकीची निवडणूक लढवणे हे काही खायचं काम नाही. त्यासाठी पैसा तर लागणारच. त्यामुळे बापू या फोनमध्ये जमीन गेली, पाटलाची बायको असून लुगडं घेऊन शकलो नाही, म्हणत आपली व्यथा कार्यकर्त्यांना सांगत आहेत.
शिंदे गटातील आमदारांच्या बंडानंतर शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली. यात ते त्यांच्या एका कार्यकर्त्यांशी बोलत होते. गुवाहाटीच्या निसर्गाचं वर्ण करताना त्यांनी काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं ओकेमध्ये आहे, असं म्हटलं आणि त्यांची ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली.