मरणानंतरही अवहेलना! सोलापुरातल्या शासकीय रुग्णालयात मृतदेहाला लागल्या मुंग्या
सोलापुरात (Solapur) शासकीय रुग्णालयात (Government hospital) धक्कादायक प्रकार समोर आलाय. 20 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाला मुंग्या (Ants) लागल्याची धक्कादायक घटना घडलीय. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याच्या आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलाय.
सोलापूर : सोलापुरात (Solapur) शासकीय रुग्णालयात (Government hospital) धक्कादायक प्रकार समोर आलाय. 20 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाला अक्षरशः मुंग्या (Ants) लागल्याची धक्कादायक घटना घडलीय. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याच्या आरोपदेखील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलाय. मात्र रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणाचा आरोप फेटाळून लावलाय. सोलापुरातील बुधवार पेठ येथील राकेश मोरे या 20 वर्षीय युवकावर 8 फेब्रुवारी पासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टीबी या आजारावर उपचार सुरू होते. काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान राकेश मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना एक धक्कादायक प्रकार आढळून आला. मृत राकेशच्या शरीराला मुंग्या लागल्याचे पहायला मिळाले.
‘उपचारांमध्ये हलगर्जीपणा नाही’
राकेशला लावण्यात आलेल्या ऑक्सिजन मास्कलाही मुंग्या लागल्या होत्या. त्यामुळे राकेशच्या मृत्यूस सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप राकेशच्या नातेवाईकांनी केलाय. मात्र उपचारामध्ये कोणताही हलगर्जीपणा झाला नसल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.
‘नातेवाईकांना कल्पना देण्यात आली होती’
रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्ण गंभीर असल्याची कल्पना देण्यात आलेली होती. मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर गाडी आणण्याचे कारण सांगून नातेवाईक निघून गेले. संध्याकाळपर्यंत मृतदेह हा जनरल वार्डातच होता. रुग्णाला नाकाद्वारे दूध दिले जात होते. तसेच सलाइनमध्येदेखील साखरेचे प्रमाण असते. नातेवाईकांनी दिरंगाई केल्याने तसेच काही प्रमाणात अस्वच्छता असल्याने हा प्रकार घडला असल्याची शक्यता असल्याचे स्पष्टीकरण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आले.
‘चौकशी करणार’
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसेच यापुढे रुग्णाचा मृतदेह हा अर्ध्या तासापेक्षा जास्तकाळ वार्डात राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे स्पष्टीकरण प्रभारी अधिष्ठाता डॉ. शाकिरा सावस्कर यांनी दिली.
आणखी वाचा :