‘फक्त एकतर्फी आयोग नेमला’, छगन भुजबळ यांची भर सभेत नाराजी व्यक्त
"धमक्या देताय... जातगणना. आम्ही म्हणतो, तुम्ही जातगणना कराना. सगळ्यांची जातगणना करा. तीन महिने घ्या. सगळ्यांची जातगणना करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी करा. कोण किती आहे, ते समोर येईल. काहीपण झालं तरी आम्ही 54 टक्के आहोत", असं छगन भुजबळ भाषणात म्हणाले.

पंढरपूर | 6 जानेवारी 2023 : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पंढरपुरात ओबीसी एल्गार मेळाव्यात राज्य सरकारच्या कामकाजांवर नाराजी व्यक्त करत भाष्य केलं. “बरं सगळेच म्हणत आहेत की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणत आहेत की, जातीय जनगणना करा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणत आहेत की, जातगणना करा, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत की, पैसा जेवढा पाहिजे तेवढा घ्या, पण जातगणना करा. सगळे म्हणत आहेत, मग कराना. ती करायची नाही. फक्त एकतर्फी मराठा आयोग नेमला आहे, मी त्यांना ओबीसी आयोग मानतच नाही. तुम्ही त्यांना एकच काम दिलंय, मराठा समाजाला कसं आरक्षण मिळेल”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“माझा त्याला विरोध नाही. पण माझा विरोध एकीकडे तुम्ही सर्व मराठा समाजाला कुणबी आरक्षण देणार आणि दुसरीकडे म्हणणार मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणार. सगळेच कुणबी होणार असतील तर मराठा कोण राहणार? मराठा समाजासाठी वेगळा कायदा करायची गरज काय? सगळ्यांनाच पाहिजे ना? कारण आता जे नवीन महात्मा गांधी उपोषण करणारे आहेत ते म्हणतात की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या. अजिबात नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या”, अशी रोखठोक भूमिका छगन भुजबळांनी मांडली.
‘धमक्या देताय… जातगणना’
“धमक्या देताय… जातगणना. आम्ही म्हणतो, तुम्ही जातगणना कराना. सगळ्यांची जातगणना करा. तीन महिने घ्या. सगळ्यांची जातगणना करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी करा. कोण किती आहे, ते समोर येईल. काहीपण झालं तरी आम्ही 54 टक्के आहोत. दलित आणि आदिवासी हे सगळे घेऊन 74 टक्के आहोत आणि इतर सगळे आमच्यासोबत आहेत”, असा दावा छगन भुजबळांनी केला.
‘आम्ही काय एवढे नामर्द झालो काय?’
“म्हणे आम्ही चप्पल मारणार आहोत. मारा… दोन्ही मारा. नाहीतर एक तुमच्याकडे आणि एक माझ्याकडे असं होईल. तुम्ही चप्पल मारताय, आमच्या लोकांच्या पायामध्ये बुटं आहेत ना, आम्ही काय एवढे नामर्द झालो काय? लढेंगे हर दिन डरे नहीं है, जितेंगे एक दिन हम मरे नहीं है”, असं छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळांचं ओबीसी समाजाला आवाहन
“ओबीसी एक करण्याच्या घोषणा झाल्या पाहिजे. स्थानिक नेत्यांनी भाषणे करायला पाहिजेत. लोकांना जागं करावं लागेल. जे कुणबी सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल. जे खोटे असतील त्याच्याविरोधात आंदोलन करावा लागेल. फक्त भाषण करुन चालणार नाही. गावागावात खोटे प्रमाणपत्र देण्याचं काम केलं जाईल तिथे लक्ष ठेवावं लागेल”, असं आवाहन छगन भुजबळांनी केलं.