हे माजी खासदार ठोकणार काँग्रेसला रामराम; बीआरएसमध्ये लवकरच प्रवेश करणार?
विदर्भातून माजी आमदार चरण वाघमारे हेही के. चंद्रशेखर राव यांच्या कामावर प्रभावित झाले आहेत. शिवाय आणखी काही माजी आमदार बीआरएसच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं.
सोलापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमार्गे महाराष्ट्रात एंट्री केली. त्यांना नांदेडमध्ये दोन सभा घेतल्या. या सभांच्या माध्यमातून त्यांनी तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. तेलंगणा शेतकऱ्यांचा विकास करू शकते. मग, महाराष्ट्र का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर हर्षवर्धन जाधव या माजी आमदारांनी चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश घेतला. विदर्भातून माजी आमदार चरण वाघमारे हेही के. चंद्रशेखर राव यांच्या कामावर प्रभावित झाले आहेत. शिवाय आणखी काही माजी आमदार बीआरएसच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं.
काँग्रेसला मोठा धक्का
आता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. सोलापूर काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी महापौर धर्माण्णा सादुल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. धर्माण्णा सादुल लवकरच के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पार्टीत प्रवेश करणार आहेत.
तेलगु भाषिक समाजामध्ये मोठा प्रभाव
उद्या काँग्रेस सदस्यत्वाचा देणार राजीनामा देणार आहेत. धर्मान्ना सादुल यांचा सोलापूर शहरातील पूर्व भागातील तेलगु भाषिक समाजामध्ये मोठा प्रभाव आहे. तेलगु भाषिक समाजाच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे बीआरएसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केल्याने निर्णय घेतला.
केसीआर यांनी काँग्रेससोबत मैत्रीची भूमिका घ्यावी यासाठी करणार प्रयत्न आहेत. येत्या 15 दिवसात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सभा घेणार असल्याचं ही सादुल यांनी जाहीर केलं.
माजी आमदार बीआरएसमध्ये
तेलंगणातील विकास पाहून जनता प्रभावित झाली आहे. माजी आमदार के. चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बीआरएसला प्रतिसाद मिळत आहे.
तेलंगणासारखा विकास महाराष्ट्रात का नाही, असा सवाल चरण वाघमारे यांनी विचारला. आता काँग्रेसचे माजी खासदारही बीआरएसमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बीआरएसची ताकद महाराष्ट्रात वाढणार आहे. भाजप तसेच इतर काही पक्षांच्या माजी आमदारांचा बीआरएसमध्ये प्रवेश होऊ शकतो.