Solapur Crime : ‘आत्महत्या नव्हे हत्याच!’ …तिच्या मृतदेहाचं माहेरच्यांकडून सासरच्या घरासमोरच दहन
आता सासरच्या मंडळींवर अंजलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात (Madha Taluka, Solapur) खळबळजनक घटना घडली. एका विवाहितेनं आत्महत्या केला. विहिरीत या विवाहितेचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ (Solapur Crime News) उडाली. दरम्यान, या विवाहितेची तिच्या सासरकडच्यांनी हत्या केली आणि मग तिचा मृतदेह विहिरीत टाकला, असा खळबळजनक आरोप कुटुंबीयांनी केलाय. माढा तालुक्यातील मिटकलवाडीमध्ये घडलेल्या या घटनेनं सगळ्यांना धक्का बसला आहे. संतप्त मुलीच्या कुटुंबीयांनी सासरच्यांच्या घरासमोरच या मुलीच्या मृतदेहावर अत्यसंस्कार (Married Women Suicide) करत तिला मुखाग्नी दिलाय. सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा सतत छळ सुरु होता, असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सासरच्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत विवाहितेच्या संतप्त नातलगांनी केली आहे.
नेमकं काय घडलं?
अंजली हनुमंत सुरवसे, असं मृत विवाहितेचं नाव आहे. तिचा 2016 मध्ये हनुमंतसोबत विवाह झाला होता. अंजली मूळची पंढरपूर तालुक्यातील उंबर पागे गावची होती. तिचं लग्न मिटकल वाडीतील हनुमंतशी लावण्यात आलं होतं. लग्नच्या सहा वर्षांनंतर अंजलीच्या मृत्यूनं तिच्या माहेरच्यांना मोठा धक्का बसला आहे.
छळ का करत होते?
सासरचे लोक अंजलीचा छळ करत होते. तिला मारहाण केली जात होती, असा आरोप करण्यात आला आहे. अंजलीचा छळ नेमका कोणत्या कारणासाठी केला जात होता, याची माहिती मिळू शकलेली नाही. या सगळ्याला कंटाळून निराश झालेल्या अंजलीनं आपलं आयुष्य संपवलं. विहिरीत उडी घेऊन तिनं आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी पाहण्यात आलंय.
आता सासरच्या मंडळींवर अंजलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 306 कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यात आली आहे.
हत्येचा गुन्हा का नाही?
दरम्यान, प्रहारचे जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के यांनी देखील याप्रकरणी आवाज उठवलाय. त्यावर शवविच्छेदन अहवाल आल्यावर ते पाहून कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय. या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल न केल्याने संतप्त नातेवाईकांनी मुलीचे सासर असलेल्या माढ्याच्या मिटकलवाडीतील घरासमोरच विवाहित मुलीच्या मृतदेहाचे दहन करुन आपला रोष व्यक्त केलाय. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.