NCP : फतवा काढणाऱ्या प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम यांच्या पदावर गंडांतर
दरम्यान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने काढलेला फतवा पक्षाने काढलेला नाही, पण बोलणाऱ्यांनी भान बाळगावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसावले आहे.
सोलापूर : अभिनेत्री केतकी चितळेने (Actress Ketki Chitale) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तिला अटकही झाली. राज्यभरातून तिच्याविरोधात टीकेची झोड उठली. विरोधकांनीही तिच्यावर निशाणा साधला. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसही आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्याचदरम्यान सोलापूरात मात्र फतव्याचं वारं समोर आलं होतं. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास कदम यांनी अशा टीका करणाऱ्या लोकांविरोधात शोधा व फोडा, असा फतवाच काढला होता. त्यात शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या परिवारावर खालच्या भाषेत टीका करतील अशा लोकांना शोधा आणि फोडा अशी मोहीम सुरू करण्यात यावी, असा आदेश देण्यात आला होता. त्याआदेशाला आणि हा फतवा काढणाऱ्याला प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम (West Maharashtra Vice President Suhas Kadam)यांच्या पदावर गंडांतर आले आहे. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी पत्राद्वारे हे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महाराष्ट्र दर्शन घडवतील
अभिनेत्री केतकी चितळे हिने पवारांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करणारी पोस्ट केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच खवळली. दरम्यान याविरोधात राज्यात अनेकांनी निषेध करत चितळेवर टीका केली होती. तर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनीदेखील केतकी सारख्या लिहीणाऱ्या मग तो निखील भामरे असेल, सुनैना होळे असो वा कादंबरी नाईक असेल, या सर्वांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महाराष्ट्र दर्शन नक्की घडवतील, असा इशारा दिला होता.
उपाध्यक्ष सुहास कदम आक्रमक
त्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टनंतर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी अशा टीका करणाऱ्या लोकांविरोधात शोधा व फोडा, असा फतवाच काढला होता. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला तसा आदेश काढला होता. या आदेशात असं म्हटलंय की, जे शरद पवार आणि त्यांच्या परिवारावर खालच्या भाषेत टीका करतील अशा लोकांना शोधा आणि फोडा, अशी मोहीम सुरु करण्यात यावी असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने म्हटले आहे.
कदम यांच्या पदावरच गंडांतर
मात्र आक्रमक भूमिका घेणाऱ्या उपाध्यक्ष सुहास कदम यांच्या पदावरच गंडांतर आले असून पक्ष शिस्त भंग केल्यानं त्यांना पदापासून दूर करण्यात आलं आहे. याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी पत्राद्वारे हे आदेश दिले आहेत. तसेच गव्हाणे यांनी फेसबूक पोस्ट करत उपाध्यक्ष सुहास कदम यांची पद स्थगिती केल्याची माहिती दिली आहे.
बोलणाऱ्यांनी भान बाळगावे
दरम्यान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने काढलेला फतवा पक्षाने काढलेला नाही, पण बोलणाऱ्यांनी भान बाळगावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसावले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी विनाश कालीन विपरीत बुद्धी, असे म्हणत अधिक बोलण्यास नकार दिला. त्याचवेळी ते म्हणाले, समाजातील वातावरण बिघडणार नाही हे पाहिले पाहिजे.