मराठा आंदोलक आक्रमक, साखळी उपोषण…राजीनामे…गावबंदी आंदोलन पेटले
राज्यात मराठा आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सहाव्या दिवशी सुरु आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी राज्यभरातही मराठा आंदोनल पेटले आहे. पुणे जिल्ह्यात दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसांच्या बॅनरला काळे फासले आहे.
सुनिल थिगळे, पुणे | 30 ऑक्टोंबर 2023 : राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आंदोलन पेटले आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी साखळी उपोषण आणि उपोषण सुरु आहे. मराठा समाजातील नेते राजीनामे देत आहेत. राजकीय नेत्यांना गावबंदी असल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तुळजापूर शहरांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे लावलेले बॅनर फाडून टाकले आहे. तसेच पुणे जिल्ह्यात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले शुभेच्छांचे बॅनरला काळे फासले आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक होत आहे.
खेडमध्ये दिलीप वळसे यांच्या बॅनरला काळे फासले
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बॅनरवर पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये काळे फासले गेले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांसाठी हे बॅनर लावले होते. त्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून २५ दिवसांपासून साखळी उपोषण तर ४ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. तरीही मंत्री महोदयांनी उपोषणस्थळी भेट दिली नाही. त्याचा निषेध करत वळसे पाटलांच्या बॅनरला काळे फासण्यात आले.
आंदोलनात लहान मुलांचा सहभाग
हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर खासदारकीचा राजीनामा दिला. आरक्षणासाठी राजीनामा देणारे ते राज्यातले पाहिले खासदार ठरले आहेत. धाराशिव तालुक्यातील रुईभर येथे लहान शालेय मुलांनी आंदोलन केले. मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणात मुलांनी सहभाग घेतला.
पुण्यात रांगोळी साकारुन वेधले लक्ष
पुण्याच्या पानशेत खोऱ्यातील डावजे गावच्या ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील यांना अनोख्या पद्धतीने पाठिंबा त्यांनी दिला. ग्रामस्थांनी गावच्या मंदिरात काकड आरती सोहळ्या दरम्यान मनोज जरांगे यांची फुलांची रांगोळी साकारली. विविध रंगांच्या फुलांच्या रांगोळीत मनोज जरांगे यांची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. गावातील सुरज मानकर, तुषार मानकर, प्रल्हाद मानकर यांनी ही रांगोळी काढलीय.