मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, आपल्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांचं देवाकडं साकडं
राज्यात महायुतीला निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादी या शर्यतीतून बाहेर आहे. पण शिंदेंची शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे. आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा म्हणून देवाला साकडं घातलं जातंय.
एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देताच भाजपच्या रावसाहेब दानवेंनी शिंदेंना निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलेला नसल्याचं म्हटलंय. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ संपण्याआधी काही तासाआधी, एकनाथ शिंदे यांनी औपचारिकपणे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि आता नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
आता, नवा मुख्यमंत्री कोण यावरुन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरु झालीय. TV9ला मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या हायकमांडने देवेंद्र फडणवीसांचंच नाव निश्चित केलंय. पण एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात निवडणूक लढली. त्यामुळं शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत असा क्लेम शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरु झालाय. पण त्यावर नेतृत्वात लढणं म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला असं नाही, असं स्पष्ट पणे भाजपकडून रावसाहेब दानवेंनी सांगितलंय.
इकडे दिल्लीतून रामदास आठवलेंनी, फडणवीसांचंच नाव निश्चित झाल्याचा दावा केलाय. भाजपच्या हायकमांडनं फडणवीसांनाच मुख्यमंत्री करण्याचं ठरवल्याचं आठवले म्हणालेत.
फडणवीसांच्या नावाचा दावा करण्यावरच रामदास आठवले थांबले नाहीत. तर शिंदेंनी एक तर उपमुख्यमंत्री व्हावं किंवा केंद्रात मंत्री व्हावं हेही आठवलेंनी म्हटलंय. शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी सर्वच प्रयत्न सुरु आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार आणि 4 माजी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितलीय. किमान 2 वर्षे तरी शिंदेंना मुख्यमंत्रिपद द्यावं अशी मागणी मोदींकडे करणार असल्याचं कळतंय. तर निकालाच्याआधीपर्यंत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असा दावा करणाऱ्या राऊतांनी, आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं म्हटलंय.
आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून देवालाही साकडं घालणं सुरु झालंय. पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती करण्यात आलीय. एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंनी त्र्यंबकेश्वरमध्ये विधीवत पूजा केली..लता शिंदेंसह शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत महादेवाला साकडं घातलं. तर नागपुरात टेकडी गणपती मंदिरात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करत पूजा अर्चना केली.
दिल्लीतून फडणवीसांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. अर्थात भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत गटनेता निवडून अधिकृत घोषणा होईल.