‘आंदोलनात काही शेतकरी शहीद होतील असं आंदोलन करु’, ‘स्वाभिमानी’चा सरकारला मोठा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसाच्या दरावरुन आक्रमक झालीय. गेल्या दोन महिन्यांपासून या विषयावर सातत्याने चर्चा सुरु आहेत. स्वाभिमानी पक्षाकडून सातत्याने याबाबतची मागणी केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची या मुद्द्यावरुन कारखानदारांशी बैठकही पार पडली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर आज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा झाली. पण तरीही त्यांच्या मागण्यांचं निरसन होताना दिसत नाहीय.

अक्षय मंकणी, Tv9 मराठी, मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : ऊस दराच्या प्रश्नावरुन कोल्हापुरातील वातावरण तापलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या प्रश्नावरुन आक्रमक झालीय. विशेष म्हणजे स्वाभिनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि कारखानदार यांच्यात तीन बैठका पार पडल्या. पण या तीनही बैठका निष्फळ ठरल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल कोल्हापूरला गेले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर या शिष्टमंडळाची आज राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. पण ही बैठकही निष्फळ ठरली आहे. या बैठकीत झालेली चर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अमान्य केलीय. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्या महामार्ग रोको आंदोलनावर ठाम आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी सहकार मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. “दोन तास सहकार मंत्र्यांसोबत चर्चा झाली. कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता की शासन शेतकरी सोबत आहे. मात्र आजच्या बैठकीत सरकार शेतकरी सोबत आहे हे वाटत नाही. जे कारखाने थकबाकी देणार आहेत, त्या कारखान्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी होती. उद्याचा चक्का जाम होणार. सहकार मंत्र्यांनी सांगीतलं की मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. मागील वर्षाचं काही मागू नका. यावर्षी करु, असं कारखानदारांचं म्हणणं आहे”, अशी प्रतिक्रिया जालिंदर पाटील यांनी दिली.
‘आंदोलनात काही शेतकरी शहीद होतील’
“मागच्या वर्षीच्या दुसऱ्या उचलीतील 400 रुपये आम्ही मागत आहोत. दिल्ली सारखं आंदोलन होऊ नये. या आंदोलनात काही शेतकरी शहीद होतील असं आंदोलन असणार आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी. शिरोली हायवे वरती आंदोलन केल जाईल”, असा इशारा जालिंदर पाटील यांनी दिला.
“सहकार मंत्र्यांकडे आम्ही आमच्या संघटनेची भूमिका मांडली आहे की, गेल्या गाळप हंगामातील दुसऱ्या हप्त्यामधील ऊसाला 400 रुपयांनी अधिक भाव देण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्याला साखर कारखानदारांचा विरोध आहे. पण आम्ही सहकार मंत्र्याना सांगितलं आहे की, 100 रुपये हे साखर कारखान्याने द्यावे आणि 300 रुपये हे राज्य सरकारने स्टेटीट्यूट कमिटिने SAP च्या माध्यमातून द्यावे, अशी मागणी केली. त्यावर सहकार मंत्री म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय कळवतो”, असं जालिंदर पाटील यांनी सांगितलं.
“पण जर संध्याकाळी निर्णय झाला नाही तर आम्ही उद्या आमच्या आंदोलनावर ठाम राहणार आहोत. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बिद्री साखर कारखान्याची निवडणूक महत्त्वाची वाटत आहे”, असंही जालिंदर पाटील यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांची विमानतळावर भेट घेतली. “ऊस दराच्या प्रश्नावरून गेले दोन महिने आंदोलन सुरू आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून दराचा प्रश्न मिटवावा”, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. “ऊस दराचा प्रश्न निकाली निघाला नाही तर आम्ही गुरूवारपासून राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत चक्काजाम करू”, असेही शिष्टमंडळाने स्पष्ट केले. सरकार हे शेतकऱ्यांच्याच बाजूने राहणार आहे. कारखानदारांच्या बाजूने आम्ही नाही. सहकारमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.