तलाठी भरतीच्या नावाने 1,14,00,000 लाखांचा गंडा, सरकारी अधिकाऱ्यासह चार जणांना बेड्या
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे तलाठी पदाच्या नोकरीच्या आमिषाने १६ तरुणांना १ कोटी १४ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या ७ जणांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी मुंबईहून ४ आरोपींना अटक केली आहे. गोविंद गिरी यांनी आपल्या मुलांसाठी आणि नातेवाईकांसाठी पैसे दिले होते.
तलाठी पदासह कामगार आयुक्तालयात नोकरी लावतो, असं आमिष दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये हा प्रकार उघडकीस आला. नोकरीचं आमिष दाखवून 7 जणांच्या टोळीने नांदेड जिल्ह्यातील 16 तरुणांना 1 कोटी 14 लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना मुंबई येथून अटक केली आहे. मुखेड येथील केंद्रप्रमुख पदावर कार्यरत असलेले गोविंद गिरी यांना त्यांच्या ओळखीतील जावेद तांबोळी याने नोकरीचं आमिष दाखवलं. गोविंद गिरी यांनी आपल्या दोन मुलांना तलाठी भरतीच्या माध्यमातून नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी 10 लाख असे 20 लाख रुपये दिले. शिवाय आपले नातेवाईक आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून देखील नोकरी लावण्याचा अमिषाला बळी पडून गोविंद गिरी यांनी पैसे गोळा केले. एकूण 16 जणांकडून 1 कोटी 14 लाख रुपये त्यांनी नोकरीसाठी म्हणून या आरोपींना दिले.
तलाठी पदाची परीक्षा झाली निकाल देखील आला. मात्र आपल्या मुलांना गुणवाढ मिळाली नाही. हे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचं गोविंद गिरी यांना समजलं. त्यांनी याबाबत मुखेड पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी पवन कुमार चव्हाण यांच्यासह जावेद तांबोळी, कल्पेश जाधव, रामदास शिंदे या चार जणांना मुंबई येथून अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. संबंधित आरोपींनी अशाप्रकारे राज्यात आणखीन कोणाची फसवणूक केली का? याचा त्याचा तपास पोलीस करत आहेत.
आमिषाला बळी पडू नका, सावध व्हा!
सरकारी नोकरी मिळावी ही आजच्या काळात प्रत्येक तरुणाचं स्वप्न आहे. पण प्रत्येकाचं ते स्वप्न साकार होत नाही. पण खूप अभ्यास केला, परिश्रम घेतला, तर अशक्य असं काहीच नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करुन परीक्षा दिली तर सरकारी नोकरी मिळू शकते. पण अनेकांना सरकारी नोकरी मिळत नाही. विशेष म्हणजे घरातील परिस्थिती बेताची असल्यास तरुणांच्या नशिबात आणखी संघर्ष असतो. पैसे कमावणं हे खूप कठीण आहे. त्यामुळे कुणी पैसे भरुन सरकारी नोकरी लावण्याचं आमिष दिलं तर अनेकजण त्याला बळी पडतात. पण अशा गोष्टी घडत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशाप्रकारे कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. नागरिकांनी सावध राहावं, असं आवाहन नेहमी केलं जातं.