आमदार प्रताप सरनाईक यांना साडे सात कोटींना गंडवले; काय आहे प्रकरण?
पैसे मिळावेत किंवा जमीन आपल्या नावावर व्हावी म्हणून सरनाईक सातत्याने प्रयत्न करत होते. सरनाईक हे 2021पासून सातत्याने जमिनीच्या व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत होते.
ठाणे | 28 जुलै 2023 : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सरनाईक यांची एका व्यक्तीने फसवणूक केली आहे. एक दोन नव्हे तर साडेसात कोटीहून अधिक रकमेची त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रताप सरनाईक यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडेही तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल 7 कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हे प्रकरण 2021चं आहे. प्रताप सरनाईक यांना घोडबंदर रोडवरील एका जमिनीचा व्यवहार करायचा होता. त्यांनी जमीन खरेदी करण्यासाठी मालाडमधील एका व्यक्तीला संपर्क साधला होता. मार्टीन बर्नार्डो, कोरिया असं या व्यक्तीचं नाव आहे. सरनाईक यांनी या व्यक्तीला या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी साडे तीन कोटी रुपये दिले. बँकेचा व्यवहारही झाला होता. मात्र, एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतरही त्या व्यक्तीने घोडबंदर रोडवरच्या जमिनीचे पेपर सरनाईक यांच्या नावावर केले नाहीत. सरनाईक यांना पैसेही दिले नाही. त्यामुळे सरनाईक चांगलेच वैतागले होते.
दोन वर्षानंतर गुन्हा दाखल
पैसे मिळावेत किंवा जमीन आपल्या नावावर व्हावी म्हणून सरनाईक सातत्याने प्रयत्न करत होते. सरनाईक हे 2021पासून सातत्याने जमिनीच्या व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, संबंधित व्यक्तीकडून त्याची टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अखेर सरनाईक यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात जाऊन या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या व्यक्तीने बँकेचे हप्ते भरले नाहीत म्हणून सरनाईक यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रारही केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये.
कोण आहेत सरनाईक?
आमदार प्रताप सरनाईक हे शिंदे गटातील महत्त्वाचे आमदार आहेत. यापूर्वी ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत होते. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच शिवसेनेतून झाली. रिक्षा चालक ते आमदार हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. ते बांधकाम व्यावसायिकही आहेत. तसेच ठाण्यातील एक बडं प्रस्थ म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर ईडीची धाड पडली होती. त्यांची ईडीकडून चौकशीही झाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.