भाजप-शिंदे गटात पुन्हा तणाव, ठाणे, कल्याण, पालघरही आमचेच, भाजप आमदाराचा मोठा दावा; शिंदे-पिता पुत्रांनाच ललकारले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजना राबवा. आम्ही या योजना पुढेही राबवणार आहोतच, असं सांगतानाच उगाचच फुकटच्या वल्गना करू नका. मोदींचा हात पकडणाऱ्या या देशात कोणीही नेता नाही, असा टोलाही संजय केळकर यांनी लगावला.
ठाणे : शिंदे गट आणि भाजपमध्ये लोकसभेच्या जागांवरून तू तू मै मै सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही भाजप नेत्यांनी शिंदे गटाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर बावनकुळे यांच्या विधानानंतर वादावर पडदा पडल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतरही दोन्ही पक्षातील कुरबुरी संपलेल्या दिसत नाही. आधी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या भाजपने आता थेट ठाणे आणि पालघरवरही दावा सांगितला आहे. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचा काल ठाण्यात मेळावा होता. या मेळाव्याला भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी संबोधित केले. यावेळी भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी संजय केळकर यांनी गिरीश महाजन यांच्यासमोरच या लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. 2014मध्ये मोदींमुळे निवडून आलेले लोक आता ठाणे, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीवर दावा करत आहेत. हे सर्वजणमोदी ट्रेनमध्ये बसूनच लोकसभेत निवडून गेले.
आपल्या पक्षातील असो की दुसऱ्या पक्षातील, सर्वजण मोदी लाटेत निवडून आले. आता अनेक प्रकारचे दावे करत आहेत. मला आश्चर्य वाटतं. किवही वाटते. भाजपशिवाय या जिल्ह्यात कोणीही निवडून जाऊ शकणार नाही. ठाणे, कल्याण, पालघर हा जिल्हा भाजपाचाच होता. कल्याण तर आहेच ठाणे लोकसभाही भाजपचीच आहे, असं सांगत संजय केळकर यांनी थेट शिंदे पितापुत्रांवर निशाणा साधला आहे.
आमचीच मेहनत
भारतीय जनता पक्षाची एवढी मोठी ताकद, एवढे मोठे सेवेचे व्रत घेऊन काम केले आहे. पण काही लोक अनेक ठिकाणी दावे देखील दाखवायला लागलेत, मला तर आश्चर्य वाटते. हा संपूर्ण जिल्हा भारतीय जनता पक्षाचा होता. कल्याण असेल पालघर असेल आणि असेल, भारतीय जनता पार्टीचेच जिल्हे होते. कल्याण लोकसभा तर आहेच ठाणे देखील भारतीय जनता पक्षाचा आहे. असेल तर हात वर करा, कल्याण लोकसभा ही भारतीय जनता पक्षाचे आहे की नाही? रामभाऊ म्हाळगी, राम भाऊ कापसे, जगन्नाथ पाटील हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. या नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे, असंही ते म्हणाले.
काही लोक आव आणत आहेत
मोदींजींच्या योजना राबविल्या असत्या तर आम्हला जास्त कौतुक वाटले असते. जणू काही आम्हीच मोदींना पंतप्रधानपदी बसवणार आहोत, अशा पद्धतीने काही लोक साळसूदपणाचा आव आणत आहेत. मोदींना नुनिवडून आणण्यासाठीच आम्ही काम करत आहोत, असं दाखवत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.