राज ठाकरे यांच्या सभेआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनसेच्या कार्यालयाला भेट; राजकीय संकेत काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवलीतील शोभा यात्रेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी डोंबिवलीकरांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मनसेच्या कार्यालयात जाऊन मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली.
डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हजारोंच्या संख्येने लोक सभेला येतील असं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आपण गुढी पाडव्याच्या सभेत सर्व काही बोलणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मात्र, त्यापूर्वीच मोठी राजकीय घटना घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज डोंबिवलीत शोभायात्रेच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले असता अचानक मनसेच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी वळसा घालून मनसेच्या कार्यालयात हजेरी लावल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला आज अचानक भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक कार्यालयात आल्याने मनसे नेतेही आश्चर्यचकीत झाले. मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यावेळी सत्कार केला. आज सायंकाळी एकीकडे राज ठाकरे यांचा मेळावा आहे. या मेळाव्यात मी काय बोलतो ते पाहा असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. तर दुसरीकडे मनसे कार्यालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही भेट राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.
मुख्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसेच्या कार्यालयात येणं ही माध्यमांसाठी मोठी बातमी होती. त्यामुळे माध्यमांनीही मनसेच्या कार्यालयात प्रचंड गर्दी केली. यावेळी मुख्यमंत्री काही तरी राजकीय स्टेटमेंट करतील अशी सर्वांना आशा होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक पत्रकारांचा हिरमोड झाला. मात्र, ही डोंबिवलीची राजकीय संस्कृती आहे. यात राजकारण आणू नका, असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले.
हम साथ साथ है
आजवरच्या सर्वात मोठ्या स्क्रिन राज ठाकरेंच्या सभेला लागल्या आहेत. संध्याकाळी नक्कीच महाराष्ट्राला पिक्चर पाहायला मिळेल, असं सूचक विधानही राजू पाटील यांनी केलं. तर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मनसेच्या कार्यालयाला भेट दिली आहे. डोंबिवलीची ही राजकीय संस्कृती आहे. राजकारण आपल्या जागी. हम साथ साथ है, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
मुख्यमंत्री पहिल्यांदाच शोभा यात्रेत
आज गुढी पाडवा असल्याने राज्यात अनेक ठिकाणी शोभा यात्रा निघत आहेत. ठाणे, गिरगाव, डोंबिवली, विलेपार्ले या भागात तर गुढी पाडव्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शोभा यात्रेला हजेरी लावली. त्यानंतर ते डोंबिवलीतील शोभा यात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी लोकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी छोटेखानी भाषणही केलं. राज्य विकासाच्या दिशेने जात असल्याचं सांगत डोंबिवलीकरांना मराठी नव वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
ठाकरेशाहीच चालणार
दरम्यान, भगव्या रंगांची अंगावर रंगरंगोटी करून, ठाकरेशाही असे नाव लिहून, हुकूमशाहीवर आसूड ओढत पालघरचे कार्यकर्ते दादरच्या शिवतीर्थावर पोहचले आहेत. एकाच्या अंगावर भगव्या कलरमध्ये ठाकरेशाही असे लिहिले तर काळ्या रंगाची रंगरंगोटी केलेल्याच्या अंगावर हुकूमशाही असे लिहिले आहे. ठाकरेशाही आसूड मारत हुकूमशाही संपविणार असे दाखवण्यात आले आहे. महाराष्ट्रात हुकूमशाही नाही, ठाकरेशाही चालणार… असे बॅनर लावून कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले आहेत. राज ठाकरे जे आदेश देतील तो आम्ही पाळणार अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.