माझ्या माणसांना भडकवण्याचे धंदे बंद कर, नाही तर घरातून उचलून नेईन; काँग्रेस नेते संजय दत्त यांची कर्मचाऱ्याला दमबाजी
माझ्या माणसांना भडकवण्याचे धंदे बंद कर. नाही तर तुला घरातून उचलून नेईन. माझं रौद्ररुप पाहिलं नाहीस तू, अशी धमकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय दत्त यांनी गॅस एजन्सीवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दिली आहे.
कल्याण: माझ्या माणसांना भडकवण्याचे धंदे बंद कर. नाही तर तुला घरातून उचलून नेईन. माझं रौद्ररुप पाहिलं नाहीस तू, अशी धमकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय दत्त यांनी गॅस एजन्सीवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दिली आहे. त्यानंतर दीपक निकाळजे नावाच्या या कर्मचाऱ्याला तीन जणांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी संजय दत्त यांच्यासह चौघाजणांवर डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय दत्त यांनी कर्मचाऱ्याला धमकावल्याच्या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली आहे. दत्त यांनी मात्र, त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आरोप करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधातच गंभीर स्वरुपाची तक्रार आहे. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या रागापोटी त्याने आपल्याविरोधात पोलिसात खोटी तक्रार दाखल केली आहे, असं दत्त यांनी सांगितलं. मात्र, फोनवर उत्तेजित होऊन बोलल्याचे त्यांनी मान्य करतानाच कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
डोंबिवली पूर्व भागातील टाटा पॉवर देशमुख होम्स परिसरात दीपक निकाळजे हा व्यक्ती राहतो. तो एका गॅस एजेन्सीत काम करतो. रविवारी रात्री घरी जात असताना दीपकला तीन जणांनी अडविले. त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो जखमी झाल्याने त्याला डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. काँग्रेसचे नेते संजय दत्त यांच्या शक्ती गॅस एजन्सीमध्ये मी काम करत होतो. त्याठीकाणी पगार व्यवस्थित मिळत नसल्याने मी अन्य ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली. रविवारी सकाळी संजय दत्त यांनी मला फोन केला आणि दमबाजी केली, असं दीपक निकाळजेने सांगितलं.
दमबाजीची ऑडिओ क्लिप पोलिसांकडे
माझ्या माणसांना भडकाविण्याचे धंदे बंद कर. नाही तर मी घरी येऊन घरी येऊन उचलून नेईल. अजून तू माझे रौद्ररुप तू बघितले नाही, अशी दमबाजी दत्त यांनी केल्याचा आरोप दीपकने केला आहे. या दमबाजीचे मोबाईल रेकॉडिंगही दीपककडे आहे. रात्री 3 जणांनी दीपकला मारहाण केली. निकाळजे यांच्या तक्रीरीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी संजय दत्तसह 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना संजय दत्त यांचे मोबाईलवरील संभाषण सुद्धा सूपूर्द केले आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी संजय दत्त यांच्यासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणावर कॅमेऱ्यावर बोलण्यास पोलिसांनी नकार दिला.
तो सिलिंडर ब्लॅकने विकायचा
माझ्या विरोधात अत्यंत खोटी आणि दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे. राजकीय दृष्ट्या मला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. ज्याने माझ्याविरोधात आरोप केले त्याच्याबद्दल ग्राहकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. तो गॅस सिलिंडर ब्लॅकने विकत होता. महिला ग्राहकांशी उद्धटपणे बोलत होता. तसेच माझ्या कर्मचाऱ्यांना भडकावित होता. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले होते. मी पंजाबमध्ये असताना माझ्या मॅनेजरने मला त्याबाबतची माहिती दिली. त्याचे सर्व कारनामे मॅनेजरने सांगितले, असं दत्त म्हणाले.
खोटी तक्रारप्रकरणी गुन्हा दाखल करा
तो महिला ग्राहकांशी उद्धटपणे बोलत असल्याने मी त्याला रविवारी फोन केला होता. त्याला समजावण्याचा प्रयत्नही केला. त्यावेळी बोलताना मी थोडा रागावून बोललो होतो. पण त्याला झालेल्या मारहाणीशी माझा काहीच संबंध नाही. या आधीही माझ्याविरोधात खोटी तक्रार केली होती. ही तक्रार खोटी असल्याचंही निष्पन्न झालं आहे. आता या प्रकरणातही पोलिसांनी सखोल चौकशी करावी. तसेच खोटी तक्रार करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Fast News | महत्वाच्या बातम्या | 22 February 2022 pic.twitter.com/JDAudH5VJX
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2022
संबंधित बातम्या:
घर मिळवण्यासाठीचा संघर्ष लक्षात ठेवा, घरं विकून, मुंबई सोडून जाऊ नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Election :अहमनदरच्या राजूरमध्ये विशेष मतदान कशासाठी, विहीर खोदण्यासाठी, निकाल कुणाच्या बाजूनं?