Ganesh Festival : खड्ड्यांसाठी चक्क गणपती बाप्पा अवतरले …! पालिका आयुक्तांना निवेदन; काय घडलं पालिकेत?
उल्हासनगरमध्ये खड्ड्यांचं प्रचंड साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. शहरातील लोकांना रस्त्यावरून चालणंही मुश्किल झालं आहे. त्यातच आता तीन दिवसांवर गणेशोत्सव आलाय. मिरवणुका निघतील. पण अजूनही खड्डे जैसे थेच आहेत.
मयुरेश जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, उल्हासनगर | 16 सप्टेंबर 2023 : गणेशोत्सव अवघा तीन दिवसांवर आला आहे. तरीही उल्हासनगरमधील खड्डे अजूनही बुजवलेले नाहीत. शहरात ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे. त्यामुळे अनेकांना वाहने चालवताना त्रास होत आहे. त्यातच आता गणपती येत आहेत. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांवरून बाप्पांची मिरवणूक कशी आणायची? असा सवाल गणेश भक्तांना पडला आहे. उद्या मिरवणुकीत खड्ड्यांमुळे काही झालं तर त्याला जबाबदार कोण असेल? असा प्रश्नही भक्तांना पडला आहे. मात्र, आता या भक्तांच्या मदतीला चक्क विघ्नहर्ता गणरायाच धावून आला आहे. गणपती बाप्पाने चक्क उल्हासनगर महापालिकेत जाऊन पालिका अधिकाऱ्यालाच निवेदन दिलं आहे. नेमकं पालिकेत काय घडलंय, जाणून तर घेऊया.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील खड्ड्याबाबत वारंवार निवेदन देऊन देखील पालिका प्रशासनाला जाग येत नाहीये. त्यामुळे अखेर महाराष्ट्र विद्यार्थी सेना शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली चक्क गणपती बाप्पानेच पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. विघ्नहर्ता वरदविनायकच महापालिकेत अवतरल्याने महापालिकेत एकच धावपळ उडाली. पालिका कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच बाप्पाला पाहण्यासाठी गर्दीही केली होती.
नागरिकांमध्ये संताप
उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. याच खड्ड्यामुळे शहरात अनेक अपघात होत आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा पालिका आयुक्तांना निवेदन देऊन खड्डे दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे स्थानिकांमध्ये पालिकेच्या विरोधात प्रचंड रोष असून संतापाची भावना आहे. त्यातच आता गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून अद्याप देखील शहरातील खड्डे जैसे थे असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.
तर पालिकाच जबाबदार
उल्हासनगर महापालिकेच्या या कामचुकारपणावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि गणेश उत्सव मंडळानी संताप व्यक्त केला आहे.गणपती मिरवणुकी दरम्यान खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना झाल्यास किंवा गणपती मूर्तीची विटंबना झाल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशाराच मनसेने दिला आहे. महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात तसा इशाराच देण्यात आला आहे.
पालिका आयुक्तांना निवेदन
पालिका प्रशासनाने तात्काळ खड्डे बुजवावेत आणि आपल्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मनोज शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ काल पालिका आयुक्तांना भेटलं. यावेळी गणपती बाप्पाच्या वेशात एक तरुणही आला होता. बाप्पाच्या वेशातील या तरुणाच्याच हस्ते पालिका आयुक्त अजीज शेख यांना खड्डे बुजवण्याचं निवेदन देण्यात आलं. तसेच खड्डे का बुजवण्यात येत नाहीत? असा जाबही विचारण्यात आला.
उद्या खड्ड्यांमुळे मिरवणुकांवर विघ्न आलं, मूर्तीची विटंबना झाली तर त्याला पालिकाच जबाबदार राहील, असा इशाराच पालिका आयुक्त अजीज शेख यांना देण्यात आला. यावेळी आयुक्तांनी गणेशोत्सवापुर्वी युद्धपातळीवर शहरातील खड्डे बुझविण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. तसे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याचे मनसेच्या शिष्टमंडळाला सांगितले.