कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात गँगवॉर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात गुन्हेगारी प्रचंड वाढत चालली आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात गँगवॉर झाला आहे. नायडू गँग आणि दही चुहा गँग मध्ये वर्चस्वच्या लढाईतून तुफान राडा झाला आहे. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा राडा झाला असून अनेक गाड्यांची तोड फोड करण्यात आली आहे. दोन्ही गँगमध्ये शिवीगाळ करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न होत आहे. संतप्त नागरिकांच्या तक्रारीनंतर कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन आरोपीना बेड्या ठोकल्या असून फरार आरोपींचा शोध सुरु आहे. पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर अशा प्रकारे गँगवॉर होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुन्हेगारी वाढली
विठ्ठलवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. पोलीस स्टेशन परिसरातच अशा घटना घडत असल्याने पोलीस प्रशासनाच्या सक्रीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
विठ्ठलवाडी परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गुन्हेगारी रोखण्यात कोळसेवाडी पोलीस स्टेशन गेल्या काही दिवसांपासून कमी पडतेय.