Video : पाटील आडनाव बदलणार का?, राजकारणात येणार का?; गौतमी पाटील हिचे थेट आव्हान, म्हणाली, पाटील आहे तर…
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा काल विरारमध्ये कार्यक्रम पार पडला. विरारमधील तिचा पहिलाच कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्यातील हजारो लोक उपस्थित होते.
विरार : सांगली, सातारा, कोल्हापूर, पुण्यासह राज्यातील विवविध भागात आपल्या नृत्याने धुमाकूळ घातल्यानंतर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील का विरारमध्ये आली. पहिल्यांदाच विरारमध्ये गौतमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. वसई, नालासोऱ्यातूनही प्रेक्षक गौतमीचा कार्यक्रम पाहायला आले होते. त्यामुळे या प्रेक्षकांना आवरता आवरता पोलिसांना नाकीनऊ आले होते. यावेळी गौतमी पाटीलने मीडियाशी संवाद साधला. तिच्या आडनावाला मराठा महासंघाने विरोध केला आहे. त्याबाबत तिला विचारण्यात आलं. त्यावरही तिने प्रतिक्रिया व्यक्त केली.
विरारमध्ये आल्यानंतर गौतमी पाटील हिने मीडियाशी संवाद साधला. मराठा महासंघाने तुम्ही पाटील आडनाव वापरलं तर तुमचा कार्यक्रम बंद पाडू असा इशारा दिला आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे, असं विचारण्यात आलं. त्यावर मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना… असं गौतमी पाटील म्हणाली. मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. मला कोणी काहीही बोलतं. मला काही फरक पडत नाही. नो कमेंट्स, असंही गौतमीने सांगितलं.
माझा कार्यक्रम साांस्कृतिक
मी कसलीही बदनामी करत नाही. माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे. तो मी पार पाडत असते. चांगला कार्यक्रम होत असतो. कोण मला नावे ठेवतो मला फरक पडत नाही. कुणाला माझ्या कार्यक्रमावर आक्षेप असेल, प् प्रश्न असेल तर त्यांनी यावं आणि माझा कार्यक्रम पूर्ण पाहावा आणि मगच बोलावं, असं थेट आव्हानच गौतमीने दिलं.
राजकारणात नाहीच
गौतमी पाटील राजकारणात येणार का? असा सवालही तिला करण्यात आलं. त्यावर तिने थेट उत्तर देत या चर्चांना पूर्णविराम दिला. मी राजकारणात येणार नाही. असं काही नाही, असंही ती म्हणाली.
फुगडी आणि सत्यनारायण पूजा
विरार पूर्वेकडी खार्डी गावात गौतमी पाटील हिचा कार्यक्रम होता. प्रभाकर पाटील यांच्या घरातील सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. गौतमी कार्यक्रम स्थळी आल्यानंतर तिच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. त्यानंतर तिने स्टेज जवळ महिलांसोबत फुगड्याही घातल्या. नंतर रात्री 9 वाजता गौतमीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी पालघर जिल्ह्यातील हजारो लोक कार्यक्रमाला उपस्थित होते.