Thane Police Headquarter : ठाणे ग्रामीण पोलिस मुख्यालयासाठी जमीन देण्याची मागणी शासनाकडून मान्य
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मौजे वाशेरे येथील 11 एकर 20 गुंठे, तर भिवंडी तालुक्यातील मौजे सापे येथील 4 एकर 80 गुंठे अशी एकूण 16 एकर जमीन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या उभारणीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांना पोलीस मुख्यालय (Police Headquarter) उभारणीसाठी भिवंडी तालुक्यातील वाशेरे आणि सापे या गावातील 16 एकर जमीन देण्याचा निर्णय महसूल विभागा (Department of Revenue)ने घेतला आहे. ठाणे पोलिसांप्रमाणेच ठाणे ग्रामीण पोलिसांना देखील त्यांचे मुख्यालय उभारण्यासाठी स्वतंत्र जागा मिळावी अशी आग्रही मागणी गेल्या काही वर्षापासून केली जात होती. याच मागणीचा विचार करून ही जागा ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाला देण्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे याबाबत आग्रही मागणी केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन आज तसा आदेशच महसूल विभागाने काढला.
या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मौजे वाशेरे येथील 11 एकर 20 गुंठे, तर भिवंडी तालुक्यातील मौजे सापे येथील 4 एकर 80 गुंठे अशी एकूण 16 एकर जमीन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या उभारणीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांना काही अटी शर्तींसह ही जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर जागा मंजूर करण्यासाठीच वापरणे वापरकर्त्यांना बंधनकारक असेल असेही नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेय
गेल्या काही वर्षात ठाणे जिल्ह्याचे वेगाने शहरीकरण झाले असून शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील गुन्हेगारी वाढली आहे. अनेकदा मुंबई, ठाणे येथून तडीपार झालेले गुंड ठाण्याच्या ग्रामीण परिसरात जाऊन आपल्या कारवाया सुरू करतात. त्यांना आळा घालण्यासाठी ठाणे शहर प्रमाणेच ठाणे ग्रामीण पोलिसांना सक्षम करण्याची नितांत आवश्यकता होती. त्यामुळेच ठाणे ग्रामीण पोलिसांचे मुख्यालय उभारण्याबाबत देखील शासनाने सकारात्मकता दाखवली असून त्यासाठी जागेची पूर्तता देखील केली आहे. लवकरात लवकर या जागी ठाणे ग्रामीण पोलिसांचे मुख्यालय उभे राहिल अशी अपेक्षा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार
शासनाच्या या निर्णयाचे ठाणे ग्रामीण पोलिसांचे पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी देखील स्वागत केले असून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली मागणी मान्य केल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. ठाणे ग्रामीण पोलिसांना बळकट करण्यासाठी यापूर्वी देखील पालकमंत्री शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन मुंबई-आग्रा महामार्गावर 22 ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची मागणी मान्य करून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 2 कोटी 55 लाखांच्या निधीला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाणे ग्रामीण पोलिसांचे मुख्यालय उभारण्याची मागणी मान्य करून त्यासाठी जमिनीची पूर्तता केल्याने जिल्ह्यातील पोलीस दल अधिक सक्षम होऊन गुन्हेगारीला चाप बसवण्यास निश्चितच मदत होणार आहे.