Bhiwandi Murder : भिवंडीत दारुड्या पतीकडून पत्नीची हत्या, आधी बेदम मारहाण केली मग जिवंत जाळले
कविता आणि तिचा पती संतोष हे दोघे त्यांच्या दोन मुलांसह चाविंद्रा येथील महाकाली ढाबा येथील चाळीत राहत होते. संतोष हा मोलमजुरी करायचा. मात्र नंतर व्यसनाच्या आहारी गेल्याने तो काहीच काम करीत नसल्याने त्याचे पत्नी कवितासोबत नेहमीच भांडण होतं असे.
भिवंडी : कौटुंबिक वादातून एका दारुड्याने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. कविता चौरसिया (35) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर संतोष चौरसिया असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी आणि पत्नीचे काही कारणावरुन वाद (Dispute) झाला. यानंतर आरोपीने पत्नीला बेदम मारहाण (Beating) केली. यात ती बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने जळणासाठी आणलेल्या लाकूड फाट्यात बेशुद्ध झालेल्या पत्नीला टाकून जिवंत जाळले. यानंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.
आधी बेदम मारहाण केली मग जिवंत जाळले
कविता आणि तिचा पती संतोष हे दोघे त्यांच्या दोन मुलांसह चाविंद्रा येथील महाकाली ढाबा येथील चाळीत राहत होते. संतोष हा मोलमजुरी करायचा. मात्र नंतर व्यसनाच्या आहारी गेल्याने तो काहीच काम करीत नसल्याने त्याचे पत्नी कवितासोबत नेहमीच भांडण होतं असे. मंगळवारी 7 जून रोजी नेहमीप्रमाणे संतोष घरी दारू पिऊन आला असता पत्नी कवितासोबत भांडण सुरू केले. वाद विकोपाला गेल्याने संतोषने पत्नीस लाकडी दांड्याने मारहाण करीत तिचे डोके लोखंडी कपाटावर आदळले. यामध्ये कविता बेशुद्ध पडली असता तिची हालचाल न जाणवल्याने पती संतोषने घराबाहेर पडवीत पावसाळ्यात जळणासाठी साठवून ठेवलेल्या लाकडाच्या ढिगाऱ्याजवळ तिला फरफटत आणले. लाकडांसह बेशुद्ध पत्नीस जाळून तिची हत्या केली. हत्येनंतर आरोपी फरार झाला.
पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या
याबाबत भिवंडी तालुका पोलिसांनी माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने अवघ्या काही तासात फरार झालेल्या संतोष चौरसिया याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी मयत कविताचा भाऊ भारत रोज याने दिलेल्या फिर्यादीवरून पती संतोष चौरसिया विरोधात हत्येसह पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. (In Bhiwandi a husband beat his wife and burnt her alive)