काय करतील? गोळ्या घालतील, वर पाठवतील, अजून काय करणार?; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?
पोरींनी काय कपडे घातले ते तिचे आईबाप बघतील... तुमची नजर कशाला जाते? या घाणेरड्या नजरेच्या लोकांपासून हा देश सोडवला पाहिजे, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.
ठाणे : मी रोज रात्री घरी गेल्यावर मला एक तरी फोन येतो. एकनाथ शिंदे विरोधात इतका बोलू नको, काहीतरी करेल, असं मला सांगितलं जातं. मी म्हणतो, पण काय करेल? गोळी मारेल.. वर पाठवेल… अजून त्यापेक्षा काय करेल? माझी मुलगी म्हणेल की, माझा बाप लढता लढता मेला. तुझा बाप शरण गेला, तुझ्या बापाने पाय पकडले असं माझी मुलगी ऐकणार नाही. माझी मुलगी हे सांगेल की महाराष्ट्र जेव्हा सगळ्यात घाणेरड्या परिस्थितीतून जात होता, तेव्हा माझा बाप छाती ठोकून त्यांच्यासमोर उभा होता आणि याचा मला अभिमान आहे, असं विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
स्वतः 50 खोके घेऊन बसले आहेत आणि हे कोणीतरी मेहनतीचे खोके आणत असेल तर त्याला संपवलं जातं. सत्तेचा माज माणसाला वेडं करतो आणि त्याला जर कोणी शहाणं करायला गेलं, तर असं होतं. पण जनता हा सत्तेचा माज उतरवते. तुम्हाला कितीही मोठी सत्ता मिळाली तरीही जनतेसमोर जाताना मान खाली घालून जा. हा माझा तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना सल्ला आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मुंगी सारखा राहा. हत्ती सारखा होऊ नको. मुंगी कुठेही जाते आणि साखर खाऊन बाहेर येते. आपल्याला लोकांच्या हृदयातली साखर खायची आहे. जनतेला परमेश्वर मानायचं आहे, असंही ते म्हणाले.
देवानेच उद्धव ठाकरेंना वाचवलं
मी काही शिवसैनिक नाही. मी शरद पवार यांचा पाईक आहे. मात्र ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना धोका दिला दिला हे कार्यकर्ता म्हणून मला दुःख होतं. उद्धव ठाकरे यांना मानेपासून पूर्ण पॅरालिसिस झाला होता. ते हलू देखील शकत नव्हते आणि त्यात यांचे टेन्शन घेऊन ते अजून आजारी पडले. केवळ देवानेच उद्धव ठाकरेंना वाचवलं.
ज्या बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांनी तुमचं बोट पकडून तुम्हाला चालायला शिकवलं, ते उद्धव ठाकरे जेव्हा मृत्यूच्या दारात उभे होते तेव्हा तरी त्यांची साथ द्यायला हवी होती. मात्र तेव्हा तुम्ही गद्दारीच्या गोष्टी केल्या यामुळे त्यांचा ताण वाढला. तरी सुद्धा उद्धव ठाकरे ठामपणे उभे राहून त्यांना आव्हान देत आहेत. आज बालाजी किणीकर यांनी जाऊन उद्धव ठाकरेंचे पाय जरी पकडले तरी उद्धव ठाकरे मातोश्रीचे दरवाजे किणीकर यांच्यासाठी उघडणार नाहीत, असा हल्लाही त्यांनी चढवला.
ते दिवस गेले
महिलांनी कोणते कपडे घालून मंदिरात जावं हे या देशात फक्त 5 लोक ठरवतील. तो फ्रॉक गुडघ्याच्यावर हवा की खाली हवा… पाय किती उघडे असावेत… हात किती उघडे असावेत… तुमची मुलगी आहे की माझी मुलगी आहे? माझ्या मुलीने काय कपडे घालायचे ते मला माहीत आहे. फक्त तुम्ही पुरुष आहात म्हणून महिलांवर अधिकार गाजवू नका. ते दिवस गेले. आता महिला स्वतंत्र झाल्या आहेत, स्वतः कमावतात, खातात, घर चालवतात, असं ते म्हणाले.
तुमची नजर जातेच कशी?
हे पाच लोक जे मंदिरात बसतात आणि म्हणतात हे घालू नका, ते घालू नका. मला त्यांना विचारायचं आहे की, तुमची नजर तिकडे जातेच कशाला? तुमचं हृदय साफ ठेवा ना… पोरींनी काय कपडे घातले ते तिचे आईबाप बघतील… तुमची नजर कशाला जाते? या घाणेरड्या नजरेच्या लोकांपासून हा देश सोडवला पाहिजे. मंदिरात जाणाऱ्या मुलींच्या कपड्यांवर पण हे नजर ठेवणार असतील तर हद्द झाली. आमच्या मुली काय कपडे घालतील हे मला माहिती आहे मी तिचा बाप आहे, असंही त्यांनी सांगितलं.