कल्याणच्या शंभर फुटी रोडवर मोठा गोंधळ, 3 रोड रोमियोंनी मुलींची छेड काढली, मग दादागिरी, विद्यार्थिनींनी चोप चोप चोपलं
कल्याण पूर्वेतील 100 फूट रोडवर टेम्पोमधून मुलींची छेडछाड करणाऱ्या तीन रोड रोमियोला विद्यार्थिनींनी चांगलाच धडा शिकवला. दरम्यान, या घटनेमुळे कल्याणमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, विद्यार्थिनींच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
कल्याण पूर्वेत महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. इथे गुन्हेगारांचा इतका हैदोस सुरु आहे की, महिला आणि मुलींना एकटं घराबाहेर सोडणं हे पालकांसाठी चिंतेचं बनलं आहे. कदाचित हे तुम्हाला अतिशयोक्ती वाटत असेल. पण कल्याणमधील गेल्या काही महिन्यांमधील घटना तर याचीच जाणीव करुन देत आहेत. कल्याण डोंबिवलीत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. कल्याण पूर्वेत नुकतंच काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात कारवाई सुरु आहे. असं असतानाही महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटना शहरात घडताना दिसत आहेत. कल्याण पूर्वेत 100 फूट रोडवर आज मुलींची छेड काढल्याचा प्रकार समोर आला. पण छेड काढणाऱ्या तीन रोड रोमियोंना सात ते आठ विद्यार्थिनींनी मिळून चांगलाच चोप दिला.
कल्याण पूर्व येथील 100 फूट रोडवर भरदिवसा मुलींची छेड काढण्याचा प्रकार घडला आहे. टेम्पोमधून मुलींची छेड काढणाऱ्या तीन आरोपींना संबंधित विद्यार्थिनींनी धडा शिकवला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नागरिकांनीही आरोपींना चांगली अद्दल घडवली. रोशन शर्मा, कपिल जयस्वाल आणि आशिष कुमार गौतम अशी या तीनही रोड रोमियोंची नावे आहेत. कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नेमकं काय घडलं?
चालत्या टेम्पोमधून तीन आरोपींनी रस्त्याने जाणाऱ्या काही विद्यार्थिनींची छेड काढली. त्यातील एका विद्यार्थिनीने या आरोपींना विरोध केल्यावर हे आरोपी टेम्पो थांबवून बाहेर आले आणि दादागिरी करू लागले. मात्र, त्यानंतर सात ते आठ विद्यार्थिनींनी एकत्रित येत आरोपींना चांगलाच चोप दिला. विद्यार्थिनींच्या आरडाओरडाने रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचेही लक्ष गेले. नागरिकांनीही हस्तक्षेप करून आरोपींना पकडले आणि चोप देत कल्याण कोळशेवाडी पोलीसाच्या ताब्यात दिले.
रोशन शर्मा, कपिल जयस्वाल आणि आशिष कुमार गौतम अशी या तीनही रोड रोमियोंची नावे आहेत. कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला असून, विद्यार्थिनींच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.