VIDEO | केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा आदिवासी बांधवांसह लोकनृत्यावर ठेका
भाजप जन आशीर्वाद यात्रेचे डहाणूमधील महालक्ष्मी मंदिर येथे आगमन झाले, त्यावेळी आदिवासी तराफा नृत्याने स्वागत करण्यात आले. डॉ. भारती पवार, प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी यांनी मंदिराबाहेरच महालक्ष्मीची पूजा केली
मोहम्मद हुसैन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी लोक नृत्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. पालघरमध्ये भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरु असताना मनोर येथे आदिवासी बांधवांनी केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागतासाठी लोकनृत्य सादर केलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या लोकनृत्यामध्ये सहभाग घेत नृत्यावर ताल धरला.
भाजप जन आशीर्वाद यात्रेचे डहाणूमधील महालक्ष्मी मंदिर येथे आगमन झाले, त्यावेळी आदिवासी तराफा नृत्याने स्वागत करण्यात आले. डॉ. भारती पवार, प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी यांनी मंदिराबाहेरच महालक्ष्मीची पूजा केली. दर्शनानंतर जन आशीर्वाद यात्रा तलासरीकडे रवाना झाली.
कोण आहेत भारती पवार?
भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्तीय ए टी पवार यांच्या स्नुषा आहेत. भारती पवार यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून ग्रामीण भागात अनेक वर्षे काम केले आहे. त्या सुरुवातीपासूनच अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून भारती पवार यांनी कुपोषणाच्या समस्येवर काम केले होते. या काळात त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला चांगलेच धारेवर धरले होते. अभ्यासू वृत्ती आणि संघटन कौशल्याच्या जोरावर भारती पवार यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
पाहा व्हिडीओ
ठाण्यात कपिल पाटील सहभागी
दुसरीकडे, ठाण्यातील आनंदनगर चेक नाका येथून भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी भाजपतर्फे ही जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आलेली आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट, नौपाडा या परिसरानंतर मासुंदा तलाव या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मंत्री कपिल पाटील यांनी आशीर्वाद घेतला. त्यांच्यासोबत भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. या ठिकाणी देखील या जन आशीर्वाद रॅलीचे मोठ्या प्रमाणात महिलांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत रॅली वर्तक नगर, घोडबंदर रोड, कळवा मुंब्रा मार्गे पुढे निघाली.
संबंधित बातम्या :
जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या डॉ. भारती पवारांचा राजकीय प्रवास